पुणे – राज्यातील विदर्भ मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासुन उष्णतेची लाट पसरली आहे. काल तर उत्तर महाराष्ट्रात जणू वैशाख वणवा पेटल्यासारखा सूर्य आग ओकत होता. भुसावळमध्ये काल सर्वाधिक ४५.९ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले.
भुसावळखालोखाल अकोला ४५.६,जळगाव ४५ तर परभणीमध्ये तापमानाचा पारा ४४.७ अंशावर होता. ही उष्णतेची लाट १५ मे पर्यंत कायम राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.काल राज्यातील बहुतेक शहरातील तापमान ४३ ते ४४ अंशावर पोहचले होते. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील लोक दिवसा रस्त्यावरुन फिरायला घाबरत आहेत.अकोला शहरात तर तापमान ४५.६ वर गेले होते.
बंगालच्या उपसागरातील ‘मोचा’ महाचक्रीवादळाचा वेग वाढणार आहे. त्यामुळे मिझोरम, त्रिपुरा आणि मणिपूर किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.चक्रीवादळाने हवेतील बाष्प खेचले गेल्याने देशभरात लाट पसरली असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
दरम्यान, मुंबई-आग्रा महामार्गावरून मुंबईकडे डाळीचा ट्रक घेऊन जाणाऱ्या अकबर शहा मेहबूब शहा (५३, रा. खैर मोहम्मद मदिना चौक, अकोला) या ट्रकचालकाचा मालेगावजवळील एका हॉटेलवर जेवणासाठी थांबलेला असताना मृत्यू झाला. उष्माघातामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.