पिलभित – उत्तर प्रदेशात गेल्या ४७ दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या व या कालावधीत ७ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या तीन लांडग्यांपैकी एका लांडग्याला पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. इतर दोन लांडग्यांनाही लवकरच पकडण्यात येईल असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
हे लांडगे बहराईच भागातील सिसिया गावातील उसाच्या फडात लपून बसले होते. त्यांचा ठावठिकाणा शोधून काढण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला. वनविभागाने त्यातील एका लांडग्याला बंदूकीच्या सहाय्याने बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन देऊन पकडले. जेरबंद केले. या कारवाईत वनविभागाच्या २५ पथकांनी भाग घेतला होता. तीन लांडग्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत ६ लहान मुलांचा आणि एका प्रौढ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर २२ जण गंभीर जखमी झाले आहेत. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, लांडग्यांना पकडण्यासाठी सापळे लावण्यात आले असून त्यांच्यावर ड्रोनच्या सहाय्यानेही नजर ठेवण्यात येत आहे.