हाथरस – उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्याच्या सिंकदराराऊ गावात भोले बाबांच्या सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 116 भक्तांचा मृत्यू झाल्याची माहिती अलिगढचे पोलीस महासंचालक शलभ माथूर यांनी दिली आहे. तर 20 जण जखमी आहेत. जखमींवर एटा येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये महिलांची संख्या मोठी आहे. सत्संग असलेला बाबा आणि त्याचे आयोजन करणारे फरार असून पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
हाथरस जिल्ह्याच्या सिंकदराराऊजवळ फुलरई गावात हा सत्संग सुरू होता. दर मंगळवारी होणार्या या सत्संगाला हजारो भाविकांची गर्दी झाली होती. सत्संग संपल्यानंतर भाविकांनी घरी जाण्यासाठी घाई केली. त्यातच दुसर्या बाजूने सत्संग करणार्या बाबाचा ताफा बाहेर पडला. काही जणांनी तिकडे धाव घेतली. त्यामुळे भाविकांमध्ये गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी सुरू झाली. महिला आणि लहान मुले पायाखाली तुडवली गेली. यावेळी सत्संगाचे आयोजन करणार्यांपैकीही कोणी वाचवायला वा लोकांना शांततेचे आवाहन करायला पुढे आले नाही, असे घटनास्थळी एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. या सत्संगामध्ये जखमी झालेल्यांची संख्या इतकी मोठी होती की, टेम्पोमधून जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. या दुर्घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि अलिगढचे पोलीस आयुक्त यांची एक समिती स्थापन करून चौकशीचे आदेश दिले आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे. योगी यांनी मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधानांनीही 2 लाखांची मदत जाहीर केली आहे.
अपघातानंतरची परिस्थिती भयावह होती. रुग्णालयाच्या बाहेर जमिनीवर मृतदेह विखुरलेले होते. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीने सिकनारौ सीएचसी, हाथरसमध्ये मृतदेहांची मोजणी केली. तेथे 95 मृतदेह विखुरलेले होते. याशिवाय एटा सीएमओ उमेश त्रिपाठी सांगितले की, आतापर्यंत हाथरसमधून अनेक मृतदेह एटामध्ये आणण्यात आले आहेत. तसेच मृतदेह आणि जखमींना टेम्पोमधून आणण्यात आले. मृतदेहांचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर पोस्टमॉर्टम केले जाईल. सत्संगात 20 हजारांहून अधिक लोकांची गर्दी होती. या अपघातानंतर मृतदेहांचा खच पाहून एका पोलिसाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या दुर्घटनेतील मृत आणि जखमींच्या नातेवाईकांनी सांगितले की, 24 तास होऊनही पुरेशी मदत मिळाली नाही. त्यामुळे जे जिवंत होते त्यांचाही मृत्यू होईल, अशी भीती वाटत होती. रुग्णालयात कोणतीही व्यवस्था नव्हती. येथे ना ऑक्सिजन सिलिंडर आहेत ना ड्रीपर. आम्ही लोकांना खेचून आणले, ते दम घेत होते.
आपल्या जखमी नातेवाईकांना रुग्णालयात घेऊन आलेल्या लोकांची ही व्यथा आणि असहायता आहे. असहाय लोक डॉक्टरांची वाट पाहत राहिले. मात्र एकच डॉक्टर असल्याने जखमींना उपचार मिळू शकले नाहीत. उपचाराअभावी जखमींना रुग्णालयाबाहेर आणि व्हरांड्यातच अखेरचचा श्वास घ्यावा लागला.
जखमींना हॉस्पिटलमधील सर्व स्ट्रेचरवर आणि अगदी बेंचवर झोपायला लावले होते. जागा शिल्लक नसताना जखमी आणि मृतांना हॉस्पिटलच्या व्हरांड्यात जमिनीवर झोपवले. काही लोक मदतीसाठी धावत होते, पण त्यांना मदत मिळाली नाही. परिस्थिती अशी होती की, एका छोट्या आरोग्य केंद्रात सर्वांवर उपचार केले जात होते. पण तेथे पुरेशी व्यवस्था नव्हती. जखमींना उच्च केंद्रात पाठवण्याची स्थिती नव्हती. घटनास्थळी एकच रुग्णवाहिका होती. घटनास्थळी आलेल्या लोकांनी सांगितले की, इतके जखमी लोक येथे आले की, रुग्णालयात जागाच उरली नाही. जखमींना वाटेतच एटा जिल्हा रुग्णालयात पाठवले जात आहे. अपघातानंतर कसेबसे जखमी आणि मृतांना बस-टेम्पोमध्ये भरून रुग्णालयात नेण्यात आले. मुख्यमंत्री योगी यांनी मुख्य सचिव मनोज सिंह आणि डीजीपी प्रशांत कुमार यांना घटनास्थळी पाठवले. घटनेच्या कारणाचा तपास करण्यासाठी एडीजी आग्रा आणि अलिगढ आयुक्तांची एक टीम तयार करण्यात आली आहे.
विश्व हरी भोलेबाबा पूर्वीचा पोलीस
हाथरस जिल्ह्यातील हा सत्संग साकार विश्व हरी भोलेबाबा याचा होता. तो पूर्वी पोलीस दलात इन्स्पेक्टर होता. ती नोकरी सोडून त्याने 20 वर्षांपूर्वी सत्संग सुरू केला. कोरोना काळातही त्याचा सत्संग वादात सापडला होता. पांढर्या कपड्यात तर कधी टाय लावून सत्संग करणे हे प्रमुख वैशिष्ट्य असलेला हा बाबा पश्चिम उत्तर प्रदेश व राजस्थानात प्रसिद्ध असून, त्याचे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह अनेक राजकीय मंडळींबरोबर संबंध आहेत. ही दुर्घटना घडल्यापासून तो फरार आहे.