लखनऊ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नवरात्रोत्सवासाठी मोठी घोषणा केली आहे. यावेळी नवरात्रीमध्ये सरकारने दुर्गा सप्तशती पाठ, शक्तीपीठांमध्ये अखंड रामायण पठणाचे आयोजन केले आहे. यासाठी सरकार प्रत्येक जिल्ह्याला एक लाख रुपये देणार आहे. योगी सरकारकडून चैत्र नवरात्री आणि रामनवमीच्या दिवशी राज्यातील देवी मंदिरे आणि शक्तीपीठांमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी लखनऊ मध्ये जिल्हा पातळीवर लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने हा अखंड रामायण सप्ताह पार पडणार आहे.
चैत्र नवरात्राच्या संपूर्ण कालावधीत २२ ते ३० मार्च या कालावधीत देवी मंदिरे आणि शक्तीपीठांमध्ये दुर्गा सप्तशतीचे पठण, जागरण कार्यक्रम आयोजित केले आहेत. तर २९आणि ३० मार्च रोजी अष्टमी आणि रामनवमीनिमित्त प्रमुख शक्तिपीठांमध्ये अखंड रामायण पठणाचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रधान सचिव संस्कृती मुकेश कुमार मेश्राम यांच्या वतीने सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी यांना या संदर्भात आदेश जारी करण्यात आला आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा, तहसील आणि ब्लॉकस्तरीय समित्या गठीत करून कार्यक्रम पूर्ण केले जाणार आहेत. या कार्यक्रमासाठी जे कलाकार उपस्थिती राहणार, त्यांना मानधन मिळणार आहे. यासाठी जिल्हा पर्यटन व सांस्कृतिक परिषदेकडून प्रत्येक जिल्ह्याला एक लाख रुपये देणार आहे. या कार्यक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधीही सहभाग महत्त्चाचा आहे. प्रत्येक कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वच्छता, पिण्याचे पाणी, सुरक्षा, ध्वनी, दिवाबत्ती,आदी व्यवस्था जिल्हा प्रशासन करणार आहे.
उत्तर प्रदेशात अखंड रामायण पठण