उत्तरकाशी- उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यामध्ये मध्यरात्री भूकंपाचे तीन सौम्य धक्के बसले आहे. अचानक जमीन हादरल्याने नागरिक आपल्या घरातून बाहेर पडले. या जिल्ह्यातील अनेक ठिकाणी लोक लहान मुलांसोबत घेऊन खुल्या जागेवर बसलेले होते. भारतीय हवामान विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार भूकंपाची तीव्रता 2.5 रिक्टर स्केल झाली. भूकंपाचे केंद्र हे भटवाडी तहसील कार्यालयाच्या हद्दीच्या सिरोर जंगलामध्ये होते.
काल रात्री 12.45 वाजता उत्तरकाशीमध्ये भूकंप झाला. भूकंपाचे हादरे बसताच लोक घरातून बाहेर पडले. हा भूकंपाचा पहिला धक्का बसल्यानंतर भूकंपाचा दुसरा धक्का 12 वाजून 47 मिनिटांनी तर तिसरा धक्का 1 वाजून 1 मिनिटाने बसला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. उत्तरकाशी येथील स्थानिक नागरिकांनी सांगितले की, अचानक खिडकी, दरवाजांचा जोरात आवाज येऊ लागला. सोबत किचनमध्ये भांडे एकावर एक आपटली.एकानंतर एक असे भूकंपाचे तीन धक्के बसले. त्यामुळे घराबाहेर पडलेले लोक रात्रभर घराबाहेर बसून होते.