वॉशिंग्टन-अमेरिकेमध्ये सध्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. यावेळी डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध कमला हॅरिस अशी लढत पाहायला मिळणार असून दोन्ही उमेदवार सध्या मुलाखती देताना दिसत आहेत.एका मुलाखतीत उडत्या तबकड्या संदर्भातही चर्चा झाली.त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलो तर ‘युफो’ म्हणजेच उडत्या तबकड्यांचे व्हिडीओ सार्वजनिक करण्याच्या धोरणास पाठिंबा देऊ!असे म्हटले.
ट्रम्प यांनी नुकतीच पॉडकास्टर लेक्स फ्रिडमॅनला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक वादग्रस्त आणि अगदीच वेगळ्या विषयांवर आपली मते व्यक्त केली.या मुलाखतीत उडत्या तबकड्या म्हणजेच युएफओसंदर्भातही चर्चा झाली.युएफओ म्हणजेच परग्रहवासियांची वाहने म्हणून समजल्या जाणार्या उडत्या तबकड्यांबद्दल अमेरिकेबरोबरच जगभरामध्ये कुतूहल कायमच राहिले आहे.असे असतानाच आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या व्यक्तीने याबद्दल बोलल्याने पुन्हा या विषयाची चर्चा सुरू झाली आहे.भविष्यात अमेरिकेमधील संरक्षण दलाचे प्रमुख कार्यालय असलेल्या पेंटागॉनच्या माध्यमातून या उडत्या तबकड्यांचे व्हिडीओ सार्वजनिकरीत्या जारी करण्याच्या धोरणाला माझा पाठिंबा असेल,असे ट्रम्प म्हणाले. पेंटागॉनला सांगून तुम्ही यूएफओचे यापूर्वी न पाहिलेले आणि अधिक फुटेज जारी करायला सांगण्याची शक्यता आहे का,असे विचारले असता ट्रम्प म्हणाले की,’मी नक्कीच हे करेन.मला हे करायला आवडेल.खरे तर मला हे केले पाहिजे’.