सोलापूर : मागील काही दिवसांपासून पुणे परिसरात जोरदार पाऊस पडत आहे, शिवाय उजनी धरण क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे दौंडमधून उजनीत येणाऱ्या विसर्गात मोठया प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. उजनी अन् वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपुरात पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे.
उजनीतून भीमेत ८० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तर वीरमधून नीरा नदीत ६३ हजाराचा विसर्ग सुरू करण्यात आला. उजनी धरणाची पाणीपातळी सध्या १०७.७ टक्के एवढी आहे. सीना माढा, दहिगांव, मुख्य कॅनॉल, वीजनिर्मिती, नदीत पाणी सोडले जात आहे. दोन ते तीन दिवसांपासून दौंडमधील विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले . या पाण्यामुळे पंढरपुरातील भीमा नदीला पूर आला असून पुरामुळे अनेक भागात पाणी शिरले. सतर्कतेच्या दृष्टीने प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. बाधित परिसरातील नागरिकांना सुरक्षेच्या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे.