नाशिक – विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या अति प्रचंड यशामुळे जनतेत ईव्हीएमवर संशय व्यक्त होत आहे. ईव्हीएम विरोधात आंदोलने पेटत असताना आता महानुभाव पंथ आणि वारकरी ईव्हीएम विरोधात रस्त्यावर उतरणार आहेत. शुक्रवारी 13 डिसेंबरला त्यांचा मोर्चा आहे. जनतेच्या मनात ईव्हीएम बद्दल संशय निर्माण झाल्याने पुढील निवडणूक ही बॅलेट पेपरवर घ्या ही त्यांची मागणी आहे.
महानुभाव पंथ आणि अखिल भारतीय वारकरी विकास मंडळ यांनी आज नाशिकमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यात ईव्हीएम विरोधातील आंदोलनाची माहिती देताना नाशिक जिल्हा महानुभाव पंथाचे अध्यक्ष महंत कृष्णराज बाबा मराठे आणि अखिल भारतीय वारकरी विकास मंडळाचे राज्य कमिटी सदस्य जनार्दन बळीराम महाराज कांदे (काकडे महाराज) म्हणाले की, निवडणूक निकालानंतर जनतेच्या मनात ईव्हीएमबद्दल शंका निर्माण झाली आहे. आमची आयोगाला विनंती आहे की, ही शंका दूर करा, नाहीतर पुढील निवडणूक ही बॅलेट पेपरवर घ्या. या मागणीसाठी आम्ही मोर्चा काढणार आहोत. नाशिक जिल्ह्यातील जनतेला आम्ही विनंती करत आहोत की, या प्रश्नाकडे संबंधित सर्व यंत्रणांचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी 13 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता नाशिकच्या गोल्फ क्लब मैदान येथे उपस्थित राहावे. इथून मोर्चा शहरातील मध्यवर्ती भागातून जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकार्यांना याबाबत निवेदन देण्यात येणार आहे. या मोर्चाचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी बोललो नाही. कोणत्याही नेत्याला आमंत्रण दिलेले नाही. पण कुणी स्वतः आले तर आम्ही त्यांना मोर्चात सामावून घेऊ. जनतेचा संशय दूर करणे हा आमचा एकमेव उद्देश आहे. न्याय मिळण्यासाठी सर्व राजकीय पक्ष व संघटनांनी या मोर्चात सहभागी व्हावे.
कायदेशीर लढाईसाठी पवारांच्या घरी बैठक
दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी आज महाविकास आघाडीतील पराभूत उमेदवारांची बैठक पार पडली. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे रमेश बागवे, हडपसरचे उमेदवार प्रशांत जगताप, कोपरगावचे संदीप वार्पे, खडकवासल्याचे सचिन दोडके, शिवाजीनगरचे दत्ता बहिरट, उत्तम जानकर यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हेदेखील या बैठकीला उपस्थित होते. यावेळी मतदार यादीतील घोटाळा, वाढलेली मते, ईव्हीएममधील अफरातफर, पराभूत उमेदवारांचे निकाल यासंदर्भात चर्चा झाली. निवडणुकीच्या निकालाविरोधात याचिका दाखल करून कायदेशीर लढाई लढण्याच्या दृष्टीने चाचपणीही करण्यात आली. याबाबत ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांच्याशी चर्चा झाली.