मुंबई – विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी स्वतंत्रपणे घेतलेल्या बैठकांमध्ये बहुतांश नेत्यांनी ईव्हीएमच्या विरोधात तक्रारी केल्या. त्याची दखल घेत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी ईव्हीएमच्या विरोधात मोठी मोहीम उभारण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
शिवसेना उबाठाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या गटातील पराभूत उमेदवारांची आज बैठक घेतली. ७० हून अधिक उमेदवार उपस्थित होते. या बैठकीत बहुतांश उमेदवारांनी ईव्हीएममध्ये गडबड झाली असल्याची तक्रार केली. त्याची दखल घेत उद्धव ठाकरे यांनी सर्व पराभूत उमेदवारांना आपापल्या मतदारसंघात व्हीव्हीपॅट पावत्यांची तपासणी करण्यासाठी अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्याचे सुत्रांनी सांगितले.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या पराभूत उमेदवारांच्या बैठकीतही अनेक नेत्यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला.त्यावर नुसता संशय घेऊन चालणार नाही. ईव्हीएम घोटाळ्याचे पुरावे गोळा करण्याच्या कामाला लागा,अशा सूचना सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उद्देशून दिल्या.
दिल्लीत आज प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनीही ईव्हीएमवर मतदान घेण्यास कडाडून विरोध केला. आम्हाला ईव्हीएम नको, मतपत्रिकांवरच निवडणुका घ्या,अशी मागणी केली. तसेच भारत जोडो न्याया यात्रेप्रमाणेच राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ईव्हीएमच्या विरोधात देशव्यापी मोहीम राबविण्याची घोषणा केली.