ईव्हीएमविरोधात गावोगावी ठराव करा! शरद पवार मैदानात उतरले

सोलापूर – विधानसभा निवडणुकीचा निकाल मान्य न झाल्याने बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा प्रयत्न करणार्‍या मारकडवाडी गावाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज प्रत्यक्ष भेट दिली आणि ईव्हीएम विरोधात लढा उभारण्यासाठी ते मैदानात उतरले. त्यांनी आवाहन केले की, या निवडणुकीत गडबड झाल्याचे आकडेवारीवरून लक्षात येत आहे. निवडणूक निकालाबाबत शंका असूनही तुमच्या गावाला चाचणी मतदानही करू दिले गेले नाही. त्यामुळे आता ईव्हीएमने मतदान नको, असा ठराव गावागावात करा. तो ठराव आम्हाला द्या. आम्ही तो योग्य ठिकाणी पाठवू.
शरद पवार यांनी आज सकाळी मारकरवाडीला भेट दिली. तिथे गावकर्‍यंशी संवाद साधत ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’ या कार्यक्रमात ते सहभागी झाले. त्यानंतर जाहीर सभा झाली. या सभेला माळशिरसचे आमदार उत्तम जानकर, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
या जाहीर सभेत मारकरवाडी गावाच्या भूमिकेला पाठिंबा देत शरद पवार म्हणाले की, मी तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो की, या महत्त्वाच्या प्रश्नाबाबत तुम्ही देशाला जागे केले. गेले दोन-तीन दिवस देशातील अनेक खासदार आम्हाला भेटत आहेत. ते दुसरी कसलीही चर्चा करत नाहीत, तर तुमच्या गावाची चर्चा करतात आणि विचारतात की हे गाव कुठे आहे? जे संपूर्ण देशातील समंजस आणि शहाण्या लोकांच्या लक्षात आले नाही ते या गावकर्‍यांच्या लक्षात कसे आले? तुम्हा सगळ्यांचे आज देश अभिनंदन करत आहे. निवडणुकीत निकाल लागतात. लोक निवडून येतात. कधी पराभव होतो. काही तक्रारी येतात. नाही असे नाही. पण सबंध देश आणि राज्यातील जनतेच्या मनात शंका का येते? याचा अर्थ निवडणूक पद्धतीबाबत काही शंका निर्माण झाली आहे आणि मतदाराला खात्री वाटत नाही. फक्त तुमच्या मनात नाही, अनेक गावांच्या लोकांच्या मनात शंका आहे. ते अस्वस्थ झाले आहेत. याच्यात कुठेतरी दुरुस्ती केली पाहिजे. जगात काय केले जाते? याचा विचार केला पाहिजे, ही भावना लोकांच्या मनात निर्माण व्हायला लागली. जगातील सगळ्यात मोठा देश असलेल्या अमेरिकेमध्ये मतपेटीत मत टाकले जाते. जगातला लोकशाहीचा दुसरा मोठा देश इंग्लंडमध्येही मतपेटीमध्ये मत टाकले जाते. युरोप खंडातील कोणताच देश ईव्हीएमवर निवडणुका घेत नाही. आख्खे जग बॅलेट पेपर मतदान घेते आहे. मग आमच्याच भारतात का नाही? आपल्याकडे शंका निर्माण होत आहेत की, याच्यात काहीतरी गडबड आहे. आम्ही काही माहिती गोळा केली. त्या माहितीत दिसते की, लोकांनी मतदान केले, पण किती लोक निवडून आले? त्यामुळे साहजिकच लोकांच्या मनामध्ये मोठी शंका निर्माण झालेली आहे. ती घालवायची असेल तर काय करता येईल? देशाच्या निवडणूक पद्धतीत बदल केला पाहिजे आणि याबद्दल जागृती तुम्ही लोकांनी केली.
पवार पुढे म्हणाले की, तुम्ही असे ठरवले की, आपल्या गावात परत मतदान आपण घेऊया. ते अधिकृत नव्हते. सरकारी नव्हते. तुम्ही गावाने बसून ठरवले की, पुन्हा एकदा मतदान वेगळ्या पद्धतीने घ्यायचे. हा तुमचा अधिकार होता. पण हा निर्णय तुम्ही घेतल्यानंतर पोलीस खात्याने याच्यावर बंदी का घातली? असा कोणता कायदा आहे? आज या ठिकाणी मी भाषण करतो आहे, तुम्ही ऐकत आहात. उद्या पोलीस खात्याने म्हटले की, मी बोलायचे नाही आणि तुम्ही ऐकायचे नाही. तर हा कुठला कायदा? तुमच्याच गावात जमावबंदी का लागू केली? तुमच्या समाधानासाठी तुम्ही पुन्हा मतदान करायचा निर्णय घेतला त्याला सरकारची बंदी कशी येऊ शकते? तुम्ही हे केले म्हणून तुमच्यावर खटले भरले. मला काही समजत नाही. काय गुन्हा केला? चोरी केली? काही केले तर त्याच्यावर खटला भरा. पण गावाने ठरवले की एका वेगळ्या दिशेने जायचे तर त्यासाठी खटला कसा भरता येईल? गावचे सरपंच आणि सगळ्यांना विनंती ही आहे की, याचा रेकॉर्ड तुम्ही आम्हाला द्या. पोलीस खात्याकडून तुमच्यावर केलेले खटले, त्याचे रेकॉर्ड या सगळ्या गोष्टी आमच्याकडे द्या. आम्ही हे ठिकठिकाणी घेऊन जाऊ. राज्याच्या निवडणूक आयोगाकडे तुमची तक्रार देऊ. राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे देऊ. देशाच्या प्रधानमंत्र्यांकडे देऊ. केंद्रीय निवडणूक आयोगाकडेसुद्धा देऊ. हे कशासाठी? तर म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो. या निवडणूक यंत्रणेचा काळ एकदा सोकावला की, तुम्हा सगळ्यांच्या अधिकारावर संकट आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ही सगळी माहिती द्या. शक्य असेल तर तालुक्यातील गावागावात ठराव करा की, आम्हाला ईव्हीएमने मतदान नको. आम्हाला जुन्या पद्धतीने निकाल पाहिजे. त्या ठरावाची प्रत आम्हाला द्या. ती कुठे पोहोचवायची त्या ठिकाणी ते पोहोचवू. आम्ही ही सगळी माहिती राज्य सरकार, केंद्र सरकार, निवडणूक आयोग यांच्याकडे देऊ.
या सभेत या मतदारसंघात विजयी झालेले आमदार उत्तम जानकर यांनीही म्हटले की, निवडणूक आयोगाने मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याचा निर्णय घेतल्यास मी राजीनामा द्यायला तयार आहे. यासाठी सर्व ग्रामपंचायतींचा ठराव करण्यासाठी तयार आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना सल्ला दिला की, आधी निवडणूक आयोगाला निर्णय घेऊद्या, त्यानंतर राजीनामा द्या. काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी मारकडवाडी गावातून लाँग मार्च काढणार असल्याची माहितीही आमदार उत्तम जानकर यांनी यावेळी दिली.
शरद पवार यांच्या मारकडवाडीतील या सभेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार टीका केली. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, शरद पवार हे अपयश लपविण्यासाठी ईव्हीएमचा मुद्दा आणत आहेत. हा मुद्दा आधी उपस्थित का केला नाही. उत्तम जानकर म्हणतात की, मारकडवाडीचा लढा अधिक महत्त्वाचा आहे म्हणून ते आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. हा खोटारडेपणा आहे. मविआचे 31 आमदार निवडून आले आहेत. ते सर्वच आमदार राजीनामा का देत नाहीत?

मारकडवाडीत दोन गट
मारकडवाडीत ईव्हीएम प्रकरणावरून दोन गट पडले आहेत. मारकडवाडीतील भाजपा समर्थकांनी राम सातपुते यांना गावातून खरोखरच चांगले मतदान झाल्याचे सांगितले. सातपुतेंनी गावासाठी 21 कोटी 49 लाख रुपयांचा निधी आणला. ते गावात आरोग्यदूत म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच गावाने त्यांना भरपूर मतदान केले. त्यांना लाडक्या बहिणींनीही भरभरुन मतदान केल्याचे त्यांनी म्हटले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top