ईव्हीएमच्या निकालात गडबड आहे का? मारकडवाडीत बॅलेट पेपरने पुन्हा मतदान होणार

मुंबई – महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होऊन सात दिवस उलटले तरी गोंधळ सुरू आहे. एक सत्तास्थापनेचा गोंधळ आणि दुसरा अविश्‍वसनीय निकालाचा गोंधळ. महाराष्ट्रात यावेळी 66 टक्के मतदान झाले. मतमोजणीनंतर जाहीर केलेल्या निकालाबाबत संपूर्ण महाराष्ट्रात संशय व्यक्त केला. 24 आमदारांनी लाखो रुपये भरून फेरमतमोजणीची मागणी केली. महाराष्ट्रात इतक्या मोठ्या संख्येत फेरमतमोजणीची मागणी यापूर्वी कधीच झाली नव्हती. त्याचबरोबर आता सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी या गावाने अजब निर्णय घेतला आहे. ईव्हीएम मतमोजणीत या गावापुरता जाहीर झालेला निकाल या गावाला मान्य नाही. त्यामुळे हे गाव आता स्वत:पुरता त्याच उमेदवारांसाठी बॅलेट पेपरने मतदान करणार आहे आणि या मतदानाचा निकाल जाहीर करणार आहे. जर हा निकाल ईव्हीएमच्या निकालापेक्षा वेगळा ठरला तर ईव्हीएमबाबत निर्माण झालेला संशय अधिकच बळावणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात मारकडवाडी येथे शरद पवार गटाचे उत्तम जानकर आणि भाजपाचे राम सातपुते हे दोन आघाडीचे उमेदवार होते. या गावाने आतापर्यंत उत्तम जानकर यांना साथ दिली होती. त्यातच उत्तम जानकर यांचे कट्टर विरोधक असलेले मोहिते -पाटील यांनी यावेळी उत्तम जानकर यांना पाठिंबा जाहीर केला होता. यामुळे उत्तम जानकर यांचा विजय निश्‍चित मानला जात होता. उत्तम जानकर हे शेवटच्या टप्प्याच्या मतदानात 13 हजार मतांच्या आघाडीने विजयीही झाले. मात्र ते केवळ 13 हजार मतांनी विजयी झाले याबाबत संशय व्यक्त होत आहे. इतकेच नव्हे तर कायम उत्तम जानकर यांच्या पाठीशी राहिलेल्या मारकडवाडीत त्यांना कमी मते पडली आणि भाजपाचे सातपुते यांना अधिक मते पडली. हे मतमोजणीत उघड झाले. मात्र गाव कायम उत्तम जानकर यांच्या पाठीशी असल्याने आपल्या गावात सातपुते यांना अधिक मते पडली हे गावकरी मानायला तयार नाहीत. यासाठीच आता या गावाने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे खरे काय झाले याचा उलगडा होईल, असे गावकर्‍यांचे मत आहे. मंगळवार 3 डिसेंबर रोजी बॅलेट पेपरने मारकडवाडी गावात मतदान होणार आहे. सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होऊन लगेचच मतमोजणी केली जाणार आहे. या मतमोजणीत सातपुतेंऐवजी उत्तम जानकर यांना जर गावात आघाडी मिळाल्याचे सिद्ध झाले तर ईव्हीएम मशीनबाबत संपूर्ण महाराष्ट्रात व्यक्त होणारा संशय अधिकच बळावणार आहे. यासाठीच हे मतदान अतिशय महत्त्वाचे आहे.
गावाने माळशिरस तहसीलदार यांना पत्र पाठवून या मतदानाच्या दिवशी सरकारी कर्मचार्‍यांनी उपस्थित राहावे अशी विनंती केली आहे. मतमोजणीसाठीही शासकीय कर्मचारी उपलब्ध करावे, अशीही विनंती करण्यात आलेली आहे. मात्र त्यांची ही मागणी अमान्य केली आहे. महाराष्ट्रातील 22 आमदारांनी मतमोजणीबाबत निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे. त्यासाठी त्यांनी आवश्यक असलेले लाखो रुपये भरले आहेत. मात्र निवडणूक आयोग पूर्ण मतांची फेरमोजणी करीत नाही. नियमानुसार निवडणूक आयोग केवळ 5 मतदान केंद्रावरील मतांची फेरमोजणी करते. त्यामुळे त्यांच्या निकालानंतरही संशय कायम राहू शकतो.
मारकडवाडीच्या प्रयोगामुळे मात्र ईव्हीएमचे सत्य असत्य सिद्ध होईल अशी आशा आहे. महाराष्ट्रात मतदान झाल्यानंतर एका गावाने स्वतंत्रपणे मतदानाबाबत खात्री करण्यासाठी पुन्हा मतदान केल्याची ही पहिलीच ऐतिहासिक घटना ठरणार आहे.

5 डिसेंबरला शपथविधी
गेला आठवडाभरापासून प्रतीक्षा असलेला महायुती सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त आज अखेर ठरला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी आज माहिती दिली की, 5 डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर संध्याकाळी 5 वाजता सरकारचा शपथविधी होणार आहे. पंतप्रधान मोदी या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. 2 डिसेंबर रोजी भाजपा कोअर कमिटीची बैठक होऊन या बैठकीला अमित शहा ऑनलाईन मार्गदर्शन करतील. त्यानंतर 3 डिसेंबरला भाजपा आमदारांची बैठक होऊन गटनेता
म्हणजेच मुख्यमंत्री उमेदवाराची निवड होईल. त्यानंतर 5 डिसेंबरला मंत्रिपदाचा शपथविधी सोहळा होईल. मात्र मुख्यमंत्रिपदी कोण असणार याचा सस्पेन्स आजही उघड झाला नाही. महायुतीतील कोणत्याही नेत्याने याबद्दल प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाबाबतची उत्सुकता अजूनही कायम आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 105 डिग्रीपर्यंत ताप आला असून डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी केली. डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावण्याची सूचना केली आहे. त्यामुळे आज दिवसभर ते घराबाहेर पडले नाहीत. दिपक केसरकर यांनी भेटायला आले होते. परंतु तब्येत ठीक नसल्याने शिंदे त्यांना भेटले नाहीत. त्यामुळे केसरकर मुंबईला परत गेले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top