नवी दिल्ली – काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांनी काल मध्यरात्री दोन वाजता आपल्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की मी संसदेत केलेले चक्रव्युहासंबंधीचे भाषण दोनपैकी एकाला आवडले नाही. त्यामुळे माझ्यामागे ईडीचा ससेमिरा लावण्याचा कट रचला जात आहे. माझ्या घरावर ईडीचा छापा कधीही पडू शकतो. त्यांच्या या सूचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाल्यापासून आक्रमक झाले आहेत. संसदेत वेगवेगळ्या मुद्यांवरून सत्ताधार्यांवर हल्लाबोल करत आहेत. दोन दिवसांपूर्वी लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासह केंद्र सरकारवर सडकून टीका केली होती. राहुल गांधी म्हणाले होते की, महाभारतात जसे अभिमन्यूला चक्रव्युहात अडकवून ठार मारण्यात आले होते तसाच प्रकार सध्या देशात सुरू आहे. एकविसाव्या शतकातही एक चक्रव्यूह रचला जात आहे. महाभारतातील चक्रव्युहासारखेच सहा लोक या आधुनिक चक्रव्युहाचे सूत्रधार आहेत. पंतप्रधान मोदी त्यात केंद्रस्थानी आहेत. चक्रव्युहाचा आकार कमळासारखा आहे. हे चिन्ह मोदी आपल्या छातीवर लावून फिरतात. अमित शहा, राजनाथ सिंह, सरसंघचालक मोहन भागवत, अदानी आणि अंबानी असे सहा जण चक्रव्यूह रचण्याच्या कटात सामील आहेत. याचाच संदर्भ देत राहुल गांधी यांनी एक्स अकाऊंटवरून पोस्ट करीत ईडी कारवाईचे सूतोवाच केले. विशेष म्हणजे, आपल्यावर ईडी कारवाई करणार असल्याची गोपनीय माहिती ईडीच्याच काही अधिकार्यांनी आपल्याला दिली आहे, असा दावा राहुल गांधी यांनी या पोस्ट मध्ये केला आहे. त्याचवेळी आपण ईडीच्या अधिकार्यांचे चहा-बिस्किटे देऊन स्वागत करण्यास उत्सुक असल्याचा मिश्किल टोलाही राहुल गांधी यांनी लगावला आहे.
राहुल गांधी यांच्या पोस्टला भाजपाने लगेच प्रत्युत्तर दिले. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी म्हटले की, राहुल गांधी काहीही बोलतात. त्यांना माहिती देणार्या ईडीच्या अधिकार्याचे नाव त्यांनी सांगावे. विरोधी पक्षनेत्याने केलेले हे वक्तव्य लाजिरवाणे आहे. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव दुष्यंत गौतम म्हणाले की, चोराच्या मनात चांदणे. तुम्ही चुकीची कामे केली तर छापे पडणारच आहेत. तुम्ही राजेशाहीत जन्माला आलात हे विसरा. ही लोकशाही आहे. लोकशाहीत सगळे सारखे असतात.
ईडी माझ्या घरावर छापा टाकणा रराहुल गांधींच्या पोस्टने खळबळ
