मुंबई – ईडीपासून वाचण्यासाठी आम्ही सगळे भाजपासोबत गेलो, अशी कबुली छगन भुजबळ यांनी राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकातील मुलाखतीमध्ये दिली. या वृत्ताने राज्याच्या राजकारणात आज खळबळ माजली. पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या ‘2024- इलेक्शन दॅट सरप्राईज्ड इंडिया’ या पुस्तकामध्ये ही मुलाखत छापण्यात आली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या या पुस्तकामुळे विरोधकांनी सत्ताधार्यांवर कडाडून हल्ला चढविला. तर भुजबळ यांनी आपण अशी मुलाखत दिलीच नाही, असे म्हणत हात झटकण्याचा प्रयत्न केला.
भाजपात गेलो तर ईडीपासून सुटका होणार असल्याने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते खूश झाले होते. ईडीपासून सुटका झाल्याने आम्ही सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. माझ्यासाठी तर ईडीपासून सुटका हा एक प्रकारे पुनर्जन्मच होता. मी ओबीसी असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या. उच्च जातीचा असतो तर मला अशी वागणूक दिली नसती, असे भुजबळ मुलाखतीमध्ये म्हणाले, असा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे.
मुलाखतीत भुजबळ पुढे म्हणतात की, दोन-अडीच वर्षे तुरुंगात काढल्यानंतर जामिनावर सुटल्यावरही मला ईडीची पुन्हा नोटीस आली. वयाच्या पंचाहत्तरीत किती वेळा चौकशांना सामोरे जायचे, असा प्रश्न होता. शंभर कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून आमच्याच पक्षाचे अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली होती. तुरुंगात असताना देशमुख यांना भाजपामध्ये सामील झालात तरच तुमची सुटका होईल, असा निरोप आला होता. तेव्हा मलाही वाटले की, माझ्याबाबतीतही ते तसेच करतील. पुन्हा तुरुंगात टाकतील, अशी भीती मला सतावत होती. तुरुंगातील दिवस आठवले की आताही माझी झोप उडते. आता या वयातही ईडी माझा पिच्छा सोडायला तयार नव्हती. माझ्यासह अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आदि नेत्यांची नावे होती. अशा परिस्थितीत भाजपाशी हातमिळवणी केल्याशिवाय सुटका नाही अशीच सार्यांची भावना झाली होती. हा विषय आम्ही शरद पवार यांच्यासमोर मांडला. त्यांना सारे समजत होते, पण ते भाजपासोबत जाण्यास अनुकूल नव्हते. शेवटी आम्ही अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. पक्षातल्या बहुतांश नेत्यांना हा निर्णय मान्य होता. भाजपासोबत गेल्यामुळे सार्यांची ईडीच्या जाचातून सुटका झाली. पुस्तकातील भुजबळांच्या या मुलाखतीमुळे विरोधकांच्या गोटात आनंद पसरला. सुप्रिया सुळे, संजय राऊत, जितेंद्र आव्हाड, नाना पटोले, विजय वडेट्टीवार आदि नेत्यांनी या मुद्यावरून सत्ताधार्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. भुजबळांनी दिलेल्या या कबुलीमुळे आम्ही दोन वर्षांपासून जो आरोप करीत होतो त्यावर शिक्कामोर्तब झाले, असे म्हणत विरोधकांनी महायुतीवर आणि भाजपाच्या दडपशाहीच्या धोरणावर हल्लाबोल केला.
काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी सांगलीतील तासगाव येथील सभेत एक गौप्यस्फोट केला होता.सिंचन घोटाळा प्रकरणी माझ्या चौकशीची फाईलवर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सही केली होती. ती फाईल देवेंद्र फडणवीस यांनी मला दाखविली होती, असे अजित पवार म्हणाले होते. तो मुद्दा आजच्या भुजबळांच्या कबुलीनंतर सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा उचलून धरला. अजित पवार यांच्या त्या वक्तव्यामध्ये आणि आताच्या भुजबळांच्या कबुलीमध्ये समान धागा आहे. ईडी, सीबीआयची भीती दाखवून भाजपाने राज्यात पक्ष फोडाफोडी केली हेच यातून सिद्ध होते, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. गोपनीय फाईल उघड केल्याप्रकरणी फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. तर भाजपाचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे, असा सूर संजय राऊत, जितेंद्र आव्हाड, पटोले, वडेट्टीवार यांनी लावला.
मला राजकारणात पडायचे नाही – राजदीप सरदेसाई
ज्यांच्या पुस्तकावरून हा गदारोळ झाला ते राजदीप सरदेसाई मीडियासमोर आले, पण त्यांनी भुजबळांच्या मुलाखतीबद्दल गोलमाल उत्तर दिले. भुजबळ म्हणतात की, मी कोणतीही मुलाखत दिली नाही यावर तुमचे काय म्हणणे आहे, असे विचारता राजदीप सरदेसाई म्हणाले की, भुजबळ हे बोलले तेव्हा माझ्याबरोबर इतरही काहीजण उपस्थित होते. पण या पुस्तकात महाराष्ट्रातील राजकारणावर एकच लेख आहे. इतरही गोष्टी आहेत. तुम्ही आधी पुस्तक वाचा, नंतर मला प्रश्न विचारा. या पुस्तकावरून मला राजकारण करायचे नाही, असे ते म्हणाले.