नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निकालाप्रमाणे अखेर ईडी अर्थात सक्तवसुली संचलनालयाचे संचालक संजय कुमार मिश्रा हे निवृत्त झाले.त्यांच्या जागी भारतीय महसूल सेवेचे अधिकारी राहुल नवीन यांची प्रभारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.नव्या संचालकांची नियुक्ती होईपर्यंत ते प्रभारी संचालकपदी राहतील.
राहुल नवीन हे १९९३ च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत.विशेष संचालकांशिवाय राहुल नवीन ईडी मुख्यालयात मुख्य दक्षता अधिकारी म्हणून काम करतात.नव्या संचालकाची औपचारिक नियुक्ती होईपर्यंत ते प्रभारी संचालकपदाची जबाबदारी पार पाडतील.मिश्रा हे २०१८ मध्ये ईडी संचालक म्हणून रुजू झाले होते.त्यांचा कार्यकाळ नोव्हेंबर २०२० मध्ये संपणार होता. केंद्राने त्यांना तीन वेळा सेवेत मुदतवाढ दिली.या निर्णयावर विरोधकांनी टीका केली, या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हानही देण्यात आले होते.
मिश्रा यांचा कार्यकाळ वाढवण्यासाठी सीव्हीसी कायद्यातही सुधारणा करण्यात आली.गेल्या जुलै महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने मिश्रा यांची तिसरी मुदतवाढ बेकायदेशीर ठरवली होती. त्यांना ३१ जुलैपर्यंत पद सोडावे लागेल, असेही न्यायालयाने म्हटले होते. मात्र, त्यानंतर केंद्र सरकारने त्यांना १५ ऑक्टोबरपर्यंत या पदावर कायम राहण्याची परवानगी देण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली होती.त्यावर न्यायालयाने त्यांना १५ सप्टेंबरपर्यंत पदावर राहण्यास परवानगी दिली. त्यानुसार ते काल शुक्रवारी आपल्या पदावरून पायउतार झाले.