ईडीचा ‘बायजू’ला दणका ९ हजार कोटींची नोटीस

बंगळुरू

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) देशातील सर्वात मोठी एडटेक तंत्रज्ञान कंपनी बायजूला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. परदेशी निधी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीच्या तपासात बायजूविरुद्ध पुरावे सापडल्याने ९ हजार कोटी रुपये भरण्यासाठी ही नोटीस बजावली आहे. बायजूला २०११ ते २०२३ दरम्यान २८ हजार कोटींची परदेशी गुंतवणूक मिळाली. याच कालावधीत कंपनीने परदेशी अधिकार क्षेत्रात सुमारे ९,७५६ कोटी परदेशी गुंतवणूक म्हणून पाठवले, असे ईडी अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

दरम्यान बायजूने हे वत्त फेटाळले आहे. ईडीकडून याबाबत कोणत्याही प्रकारची नोटीस किंवा सूचना मिळाली नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. एडटेक स्टार्टअपद्वारे मिळालेल्या गुंतवणुकीवर आणि परदेशात निधी हस्तांतरित केल्याबद्दल परकीय चलन नियमांचे कथित उल्लंघन केल्याच्या चौकशीचा भाग म्हणून ईडीने एप्रिलमध्ये बायजूशी संबंधित अनेक ठिकाणांवर छापेमारी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top