बंगळुरु – भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या नावे आज आणखी एक ऐतिहासिक कामगिरी नोंदली गेली आहे. अंतराळात दोन अंतराळयानांना एकत्र जोडण्याची (डॉकिंग) अत्यंत महत्वाकांक्षी आणि तेवढीच आव्हानात्मक मोहीम इस्रोने यशस्वी केली. आज सकाळी इस्रोचा हा डॉकिंगचा प्रयोग यशस्वी झाला. इस्रोने ३० डिसेंबर रोजी रात्री दहा वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून या स्पेस डॉकिंग मोहिमेचे प्रक्षेपण केले होते. मोहिमेअंतर्गत पीएसएलव्ही-सी६० या रॉकेटच्या साह्याने पृथ्वीपासून ४७० किलोमीटर अंतराळात दोन याने सोडण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे अभिनंदन करत येत्या काळातील अनेक महत्त्वाच्या योजनांच्या दृष्टीने हे मोठे पाऊल आहे, असे म्हटले आहे. या यशस्वी मोहिमेमुळे स्पेस डॉकिंग करणारा हा जगातील चौथा देश बनला आहे. याआधी केवळ अमेरिका, रशिया आणि चीन या देशांनाच स्पेस डॉकिंग करणे शक्य झाले होते.
इस्त्रोचे स्पेस डॉकिंग यशस्वी दोन याने एकमेकाशी जोडली
