इस्त्रोची देदीप्यमान कामगिरी! बुधवारी शंभरावे रॉकेट उड्डाण

बंगळुरु- भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रो येत्या 29 जानेवारीला नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली आहे. येत्या बुधवारी इस्त्रो श्रीहरीकोटाच्या सतिश धवन अवकाश तळावरून शंभरावे रॉकेट प्रक्षेपित करणार आहे.
बुधवारी पहाटे 6 वाजून 23 मिनिटांनी जीएसएलव्ही-एफ 15 या रॉकेटच्या सहाय्याने एनव्हीएस-02 हा उपग्रह अवकाशात स्थापित केला जाणार आहे. हे उड्डाण इस्त्रोचे सतिश धवन अंतराळ तळावरून होणारे शंभरावे उड्डाण असणार आहे.
जीएसएलव्ही-एफ 15 च्या प्रक्षेपणाचे केवळ ते इस्त्रोचे शंभरावे उड्डाण आहे एवढ्यापुरतेच महत्त्व आहे असे नाही. तर या उड्डाणाच्या माध्यमातून अत्याधुनिक अवकाश तंत्रज्ञान देशातच विकसित करण्याच्या इस्त्रोच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मिळालेले यश असे मानले जात आहे. एनएव्ही-आयसी या उपग्रहावर अत्याधुनिक दिशादर्शक प्रणाली ही संपूर्ण भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केलेली प्रणाली आहे.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे क्रायोजेनिक तंत्रज्ञानावर आधारित जीएसएलव्ही या रॉकेटचे हे आठवे उड्डाण असणार आहे. त्यातून इस्त्रोने अत्याधुनिक अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मिळविलेले प्रभुत्व आणि कौशल्य अधोरेखित होते.
या अवकाश मोहिमेचे प्राथमिक उद्दिष्ट्य एनएव्ही-02 उपग्रह पृथ्वी भोवतालच्या लंबवर्तुळाकार कक्षेत स्थापित करणे आहे. हा उपग्रह भारताचा संपूर्ण भूभाग आणि त्यापलिकडच्या दीड हजार किलोमीटरपर्यंतच्या कक्षेत कार्यरत असणार आहे. इस्त्रोच्या यूआर सॅटेलाईट सेंटरमध्ये एनएव्ही – 02 या उपग्रहाचे आरेखन आणि निर्मिती करण्यात आली आहे. निर्मितीनंतर अत्यंत खडतर अशा वैज्ञानिक चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर आता हा उपग्रह अवकाशात स्थापित होण्यासाठी सज्ज झाला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top