\’ इस्टर्न फ्री वे\’च्या दुरुस्तीसाठी
पालिका २४ कोटी खर्च करणार

मुंबई – पूर्व उपनगरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पूर्व मुक्त मार्ग म्हणजेच इस्टर्न फ्री वे उभारण्यात आला आहे.मात्र या मार्गावर अनेक ठिकाणी दुरुस्तीची गरज निर्माण झाली आहे. पालिकेने या कामासाठी गेल्या वर्षी निधीची तरतूद केली होती. मात्र त्याला मुहूर्त सापडत नव्हता. अखेर पालिकेला या कामासाठी मुहूर्त सापडला आहे. लवकरच या रस्त्याची दुरुस्ती केली जाणार आहे. या कामासाठी पालिका २४ कोटी ४१ लाख रुपये खर्च करणार आहे.

मुंबईच्या पूर्व उपनगरामधून शहरांमध्ये मंत्रालय विधान भवन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी येण्यासाठी तासनतास वाहतूक कोंडीमधून मार्ग काढत प्रवास करावा लागत होता. हा त्रास कमी करण्यासाठी एमएमआरडीएने सन २०१० मध्ये पी डि\’मेलो रोड ते मानखुर्द गोवंडीदरम्यान १६.८ किमीचा पूर्व मुक्त मार्ग बांधला आणि पालिकेकडे २०१५ मध्ये ईस्टर्न फ्री वे देखभालीसाठी हस्तांतरित केला.या मार्गामुळे पूर्व उपनगरातून २० ते २५ मिनिटांमध्ये मुंबई शहरामध्ये पोहोचणे सोपे झाले.या मार्गामुळे वाहतुकीचा प्रश्न निकाली निघाला आहे. प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले आहे.

हा मार्ग हस्तांतरित झाल्यानंतर गेल्या काही वर्षांमध्ये कोणतेही मोठ्या प्रमाणात दुरुस्तीचे किंवा देखभालीचे काम झाले नव्हते.त्यामुळे या मार्गावर वडाळा भक्ती पार्क ते म्हैसूर काॅलनी,चेंबूरच्या पांजरापोळपर्यंत रस्त्यावरील काँक्रीटचा थर खडबडीत झाला आहे.त्यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.याच मार्गावरील बोगद्यातही पाण्याची गळती झाली आहे.तसेच विजेचे दिवे बंद पडल्यामुळे अंधार झाला आहे.

Scroll to Top