इस्लामाबाद – पाकिस्तानच्या एका न्यायालयाने माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना एका भ्रष्टाचार प्रकरणात शिक्षा सुनावली. इम्रान यांना १४ वर्षांची, तर बुशरांना ७ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या दोघांवर सरकारी तिजोरीतील ५० अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप आहे.
इम्रान खान यांना या प्रकरणात ऑगस्ट २०२३ पासून अदिया येथील तुरुंगात आहेत. याच तुरुंगात न्यायालय स्थापन करण्यात आले आहे. इम्रान खान पंतप्रधान झाल्यावर त्यांनी भूमाफिया मलिक रियाझला मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकवले. लंडनमध्ये त्यांचे ४० अब्ज रुपये जप्त करण्यात आले. नंतर ब्रिटिश सरकारने हा पैसा पाकिस्तानला सुपूर्द केला. मात्र, इम्रान यांनी ही माहिती मंत्रिमंडळाला दिली नाही. ही रक्कम गुप्त खात्यातून इम्रान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आली. इम्रान यांनी अल कादिर ट्रस्टची स्थापना करून धार्मिक शिक्षण देण्यासाठी अल कादिर विद्यापीठाची स्थापना केली. त्यासाठी मलिक रियाझने कोट्यवधी रुपयांची जमीन दिली. तसेच बुशरा बीबी यांना हिऱ्याची अंगठी भेट दिली. त्याबदल्यात रियाझची सर्व प्रकरणे बाद करण्यात आली. कोट्यवधी रुपयांची सरकारी कंत्राटेही रियाझला देण्यात आल्याचा आरोप आहे.