इस्लामाबाद- पीटीआय नेते फवाद चौधरी यांना रात्री उशिरा पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर आज सकाळी पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) उपाध्यक्ष मखदूम शाह मेहमूद कुरेशी यांना इस्लामाबाद पोलिसांनी अटक केली. त्यांना अज्ञातस्थळी नेण्यात आले आहे. याबाबतची माहिती पीटीआय पक्षाने ट्विट करत दिली असून कुरेशी हे इम्रान खान यांच्या विश्वासातील सर्वात महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत.
पंजाब आणि खैबर पख्तूनख्वामधील दंगली आणि जाळपोळ प्रकरणात कुरेशी हे पोलिसांना हवे होते. बुधवारी दुपारी पोलिसांना त्यांना अटक करण्याचे प्रयत्न केले होते. मात्र ते काही पोलिसांच्या हाती लागले नाही. मात्र त्यानंतर आज त्यांना इस्लामाबादमधील गिलगिट-बाल्टिस्तान हाऊसमधून अटक केली. अटक करण्यापूर्वी कुरेशींनी पीटीआय कार्यकर्त्यांना देशातील खऱ्या स्वातंत्र्यासाठी लढा सुरू ठेवण्याचे आवाहन केले. कुरेशी म्हटले आहे की, आपण काहीही चुकीचे केले नसल्यामुळे आपल्याला कसलाही पश्चात्ताप नाही. दरम्यान, पीटीआयचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर झालेल्या हिंसक आंदोलनात 50 जणांचा मृत्यू झाल्याबद्दल कुरेशी यांनी दुःख व्यक्त केले आहे.