बंगळुरु- कामाचे तास आठवड्याला 72 पेक्षाही जास्त असायला हरकत नाही, असे वक्तव्य इन्फोसीसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याला लार्सन अँड टुब्रो कंपनीचे सुब्रमणियन यांनी पाठिंबा दिला. तेव्हापासून त्यांच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे. आता तर कामाच्या तासांवरून बंगळुरुमध्ये आयटी कर्मचारी रस्त्यावरच उतरले आणि त्यांनी तीव्र आंदोलन केले. नारायण मूर्ती आणि सुब्रमणियन यांचा निषेध करत त्यांच्या प्रतिमांचेही दहन केले. हे लोण वाढत जाण्याची शक्यता आहे.
कर्नाटक राज्य आयटी कर्मचारी संघटनेच्या (किटू) नेतृत्वाखाली काल हे आंदोलन करण्यात आले. आयटी क्षेत्रासाठी आठवड्याचे कामाचे तास वाढवून ते 70 ते 90 पर्यंत असावेत, असे मत मूर्ती आणि सुब्रमणियन यांनी व्यक्त केले होते. त्यावरून आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. काल जे आंदोलन झाले त्याआधी रविवारी फ्रिडम पार्क येथेही आंदोलन करण्यात आले होते. नोकरी आणि खासगी आयुष्य यात समतोल असणे हा प्रत्येक कामगाराचा हक्क आहे, अशी भूमिका घेत कर्मचाऱ्यांनी कामाचे वाढीव तास, विनाभरपाई ओव्हरटाईम आणि कार्यालयीन वेळ संपल्यानंतरही कर्मचाऱ्यांनी कंपनीसाठी उपलब्ध असावे याला विरोध केला.
नारायण मूर्ती यांनी कामाचे तास वाढविण्याबद्दल वक्तव्य केल्यानंतर महेंद्र कंपनीचे मालक आनंद महिंद्र यांनी विरोध करीत म्हटले होते की, मला माझ्या कुटुंबाला वेळ देणे महत्त्वाचे वाटते. त्यांनी पत्नीच्या डोळ्यात डोळे घालून बसल्याचा आपला फोटो पोस्ट केला. त्यानंतर अनेक मान्यवरांनी त्यांच्या म्हणण्याला पाठिंबा देत पत्नी सोबतचे फोटो पोस्ट केले होते. तरीही नारायण मूर्ती यांनी कामाचे तास वाढविण्याच्या भूमिकेवरून माघार घेण्यास नकार दिला. माझ्या अंतापर्यंत मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे असे ते म्हणाले. त्यामुळे या विषयावर वाद सुरूच आहे. फ्रान्स आणि इतर काही देशांत कामाचे तास कमी तर आहेतच, पण कामकाजाच्या वेळेनंतर कर्मचाऱ्याला काम सांगण्यास मनाई आहे. कर्मचाऱ्याला कामाबाबत मेल पाठविला तरी मालक वा अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची तरतूद कायद्यात केली आहे. पण आपल्याकडे मात्र नारायण मूर्ती आणि सुब्रमणियनसारखे उच्च अधिकारी कामाचे तास वाढविण्यावर ठाम आहेत.
इन्फोसीस, एल अँड टीच्या विरोधात आयटी कर्मचाऱ्यांचे उग्र आंदोलन
