मिलान – इटलीतील व्हेनिस या रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर एका प्रचंड मोठ्या कालव्याचे दर्शन घडते. हा ग्रँड कॅनॉल एखाद्या विस्तीर्ण नदीसारखा दिसतो. याच कालव्यातील रियाल्टो ब्रिजजवळचे पाणी काल रविवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास अचानक हिरवे झाल्याचे निदर्शनास आले. या चमत्कारिक घटनेनंतर प्रशासनाने यामागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असे इटलीच्या अग्निशमन विभागाने सांगितले.
या घटनेनंतर इटलीतील प्रादेशिक पर्यावरण संरक्षण एजन्सीकडे या बदललेल्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी देण्यात आले आहे.या पाण्याचा रंग नेमका कोणत्या पदार्थामुळे बदलला असावा त्याचा शोध सुरू असल्याचे या विभागाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे. व्हेनिस प्रीफेक्टने काय घडले हे समजून घेण्यासाठी आणि संभाव्य प्रतिकारक उपायांचा अभ्यास करण्यासाठी पोलिस दलांची आपत्कालीन बैठक बोलावली आहे, असे वृत्त ‘अन्सा’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. याआधीही अशीच काहीशी घटना घडली होती. रोमच्या ट्रेव्ही कारंजाचे पाणी काळे करण्यासाठी भाजीपाला कोळशाचा वापर करण्यात आला होता. त्यावेळी इटलीतील काही पर्यावरणवादी मंडळींनी त्याचा जोरदार निषेध केला होता.मात्र या ताज्या घटनेत कुणीही पर्यावरणवादी यासंदर्भातील कोणताही दावा करण्यासाठी पुढे आलेला नाही.