रोम – इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या उंचीवरून खिल्ली उडविल्याबदद मिलानच्या न्यायालयाने एका पत्रकाराला ५ हजार युरो म्हणजे भारतीय चलनात सुमारे साडे चार लाख रुपयांचा दंड ठोठावला. गिऊलिया कोर्टेस असे या पत्रकाराचे नाव आहे. कोर्टेस यांनी २०२१ साली जॉर्जिया मेलोनी यांच्या उंचीबाबत आक्षेपार्ह भाष्य करणारी पोस्ट एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केली होती.त्याविरोधात मेलोनी यांनी कोर्टेस यांच्यावर मिलान न्यायालयात मानहानीचा दावा केला होता.
कोर्टेस यांनी मेलोनी यांची तुलना हुकूमशहा बेनेटो मुसोलिनी याच्याशी करताना त्यांची उंची अवघी चार फूट असल्याची टीप्पणी केली होती.
दरम्यान, आपल्याला झालेल्या दंडाबद्दल प्रतिक्रिया देताना कोर्टेस यांनी पंतप्रधान मेलोनी आणि इटलीच्या सरकारवर निशाणा साधला. वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यासाठी सध्याचा काळ कठीण आहे. जागतिक पत्रकार स्वातंत्र्य निर्देशांकात इटली ४६ व्या स्थानावर पोहोचली आहे,अशी टीका कोर्टेस यांनी केली.