इचलकरंजी- सलग २५ वर्षे उत्तम प्रतिसाद मिळविणारी ‘मनोरंजन करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा’ यंदाही २७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. मनोरंजन मंडळ आणि श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्यावतीने ही स्पर्धा होणार आहे.
स्पर्धेचे हे २६ वे वर्ष असून ही स्पर्धा इचलकरंजी येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहामध्ये २७ ते ३० डिसेंबर या कालावधीत होणार आहे.स्पर्धेमधील प्रथम क्रमांक विजेत्या संघास २ हजार ५०० रुपये व सन्मान चिन्ह, द्वितीय क्रमांक १५ हजार रुपये व सन्मान चिन्ह. तृतीय क्रमांक १० हजार रुपये व सन्मानचिन्ह आणि उत्तेजनार्थ ५ हजार रुपये तसेच विशेष उत्तेजनार्थ ३ हजार रुपये अशी पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, स्त्री व पुरुष अभिनय याकरिता प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी रोख रक्कम आणि सन्मान चिन्हे देण्यात येणार आहेत.त्याचप्रमाणे प्रकाश योजना, पार्श्वसंगीत, नेपथ्य, रंगभूषा आणि वेशभूषा या तांत्रिक विभागांसाठीही प्रथम आणि द्वितीय अशी वैयक्तिक स्वतंत्र अंदाजे ३० रोख पारितोषिके आणि प्रशस्तीपत्रे देण्यात येणार आहेत.स्पर्धेतील स्त्री अभिनय पुरस्कार स्व. करुणा यशवंत देव यांच्या स्मरणार्थ प्रदान करण्यात येतील.प्रवेश अर्ज पाठविण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर ही आहे.