इचलकरंजी- शहरात फिरणारी मोकाट जनावरे पकडण्यासाठी इचलकरंजी महापालिका प्रशासनाने विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेंतर्गत या जनावरांचा मालक आढळून आल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, असा इशारा पालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिला आहे.
पालिका प्रशासन ही दंडात्मक कारवाई करताना या मोकाट जनावरांसाठी पालिकेकडून होणारा चारा, पाणी आणि इतर सर्व बाबींचा खर्च संबंधीत जनावराच्या मालकाकडून वसूल करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा उपद्रव वाढला आहे. याबाबत अनेक सामाजिक संस्थांनी तक्रारी केल्या आहेत. या जनावरांच्या फिरण्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. याची दखल घेत पालिका प्रशासनाने ही मोकाट जनावरांना पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्याचप्रमाणे या मोहिमेच्या कारवाईत अडथळा अणणार्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. तसेच अशी जनावरे असलेल्या मालकांच्या सोबत जनावरांचे फोटो काढून ते सोशल मीडियावर नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध केले जाणार असल्याचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितले.