इचलकरंजी – ‘महाराष्ट्राचे मँचेस्टर ‘ म्हणून ओळखल्या जाणार्या इचलकरंजीत गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा सुती धाग्यांमध्ये ‘विस्कोस’ अर्थात मानवनिर्मित धाग्याची भेसळ केली जात आहे. त्याचा फटका यंत्रमागधारकांना बसत आहे.काही व्यापाऱ्यांकडून दुय्यम दर्जाचे कापड असल्याचे कारण देत किंमतीत कपात करणे,रक्कम देण्यास विलंब करणे असे प्रकार घडत आहेत.त्यामुळे यंत्रमागधारक व व्यापारी यांच्यात वादावादीचे प्रकार घडत आहेत.
यंत्रमागधारकांना सूतगिरण्यांकडून सूत उपलब्ध होते, पण त्यामध्ये नैसर्गिक धाग्यात मानवनिर्मित धाग्याची भेसळ केली जात आहे.या सुतापासून तयार केलेल्या कापडावर प्रक्रिया करताना ही बाब ठळकपणे दिसून येते. कापसाची टंचाई निर्माण झाल्यास बऱ्याचवेळा विस्कोसचा वापर केला जातो. यापूर्वीही असे प्रकार घडत होते. त्याबाबत वादावादी झाल्यानंतर सूतगिरण्यांनी असे प्रकार थांबवले होते. आता पुन्हा या प्रकारामुळे यंत्रमागधारकांना नाहक फटका बसत आहे.
वास्तविक सूतगिरण्यांकडून सुताची हमी दिली जात नाही. त्यामुळे कापड सौदे करताना डाईंगची हमी व्यापारी व दलालांना देऊ नये,असे आवाहन इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स असोसिएशनने केली आहे. बऱ्याचवेळा कापड व्यापारी डाईंग प्रक्रिया झाल्यानंतर नुकसानभरपाई मागतात. त्यामुळे यंत्रमागधारक व व्यापाऱ्यांत वाद होतो. यासंदर्भात कोणाची तक्रार असल्यास संबंधित यंत्रमागधारकांनी असोसिशनशी संपर्क साधावा,असे आवाहन अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.