कॅलिफोर्निया- अमेरिकन चिप निर्माता कंपनी इंटेलने काल कर्मचारी कपातीची घोषणा केली. इंटेल कंपनी १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे.या कंपनीमध्ये सध्या १ लाख २४ हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत असून जवळपास १८ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाणार आहे.या निर्णयामुळे कंपनीचे तब्बल २० अब्ज डॉलर वाचणार आहेत.
इंटेल कंपनीने गेल्यावर्षीही मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली होती. इंटेलने २०२३ मध्ये ५ टक्के कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. यामुळे २०२५ पर्यंत १ हजार कोटी डॉलरचा खर्च वाचेल असे स्पष्टीकरण त्यावेळी कंपनीने दिले होते.यंदाच्या वर्षी खर्चात २० अब्ज डॉलरची कपात करण्याची इंटेलची योजना आहे.नुकतेच कंपनीला १.६ अब्ज डॉलरचे नुकसान झाले होते. त्यामुळे कंपनीने खर्चात कपात करण्यासाठी कर्मचाऱ्यांना नारळ देण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयानंतर कंपनीच्या शेअर १ टक्क्यांनी वधारला.तत्पूर्वी शेअरमध्ये ४० टक्क्यांहून अधिक घसरण पहायला मिळाली होती.गेल्या अनेक वर्षांपासुन इंटेलचे लॅपटॉपसाठी लागणार्या सेमी कंडक्टर मार्केटमध्ये वर्चस्व होते.पण गेल्या काही वर्षांत ही कंपनी थोडी मागे पडू लागली आहे.