इंटेलचे सहसंस्थापक गॉर्डन मूर यांचे निधन

हवाई – इंटेल कंपनीचे सहसंस्थापक गॉर्डन मूर यांचे शनिवारी २५ मार्चला हवाई येथे निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. सेमीकंडक्टरची निर्मिती आणि आजच्या काळात वापरले जाणारे संगणक विकसित करण्यात मूर यांचे मोठे योगदान होते.
गॉर्डन अर्ले मूर यांचा जन्म ३ जानेवारी १९२९ रोजी सॅन फ्रान्सिस्को येथे झाला. मूर यांनी सेमीकंडक्टरची डिझाइन आणि त्याच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. मूर यांनी १९६८ साली काही सहकाऱ्यांसह इंटेल कंपनीची स्थापना केली. या कंपनीचे नाव पूर्वी इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक्स असे होते. मूर हे १९७९ मध्ये इंटेलचे सीईओ बनले. त्यांनी आठ वर्षे सीईओ म्हणून काम केले. मूर यांनी शेवटच्या काही वर्षात स्वत:ला सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात वाहून घेतले होते. गेल्या वर्षी इंटेलने त्यांच्या सन्मानार्थ ओरेगॉन येथील कार्यालयाला गॉर्डन मूर पार्क असे नाव दिले.

Scroll to Top