नवी दिल्ली – लैंगिक शोषण प्रकरणी जोधपूरच्या तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला स्वयंघोषित गुरू आसाराम बापूला राजस्थान हायकोर्टाने ७ दिवसांची पॅरोल रजा मंजूर केली आहे. शिक्षा ठोठावल्यानंतर ११ वर्षांनी पहिल्यांदाच आसाराम बापूला पॅरोल मंजूर झाला आहे. आसाराम बापूला उपचारासाठी पुण्याच्या माधवबाग आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात येणार आहे.
जोधपूरमधल्या आश्रमात अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आसाराम बापू २०१३ पासून तुरुंगात आहे. आसाराम बापूने याआधीही उपचारासाठी पॅरोलसाठी अर्ज केला होता, मात्र तो प्रत्येकवेळी फेटाळण्यात आला. यापूर्वी आसारामला जोधपूर येथील खासगी आयुर्वेदिक रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आले होते. तिथे आसारामने पुण्यातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेतले. मात्र त्यानंतरही त्याची प्रकृती खालावल्याने त्याला जोधपूर एम्समध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर आसारामने पॅरोल अर्ज दाखल केला होता. तो आता स्वीकारण्यात आला आणि उपचारासाठी ७ दिवसांच्या पॅरोलची रजा मंजूर करण्यात आली.