दिसपूर
आसाम आणि अरुणाचलमधील नागरिक गेल्या एक महिन्यापासून पुराशी झुंज देत आहेत. आसाममध्ये ३ लाखांहून अधिक नागरिक या पुरात बाधित झाले आहेत. ते तात्पुरत्या छावण्यांमध्ये राहत आहेत. रविवारी पुराने पुन्हा उग्र रूप धारण केले असून आतापर्यंत ६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
आसाममधील पूरस्थिती गंभीर होत असून काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पातील २३३ वन शिबिरांपैकी २६ टक्क्यांहून अधिक पाण्याखाली गेली आहेत. नागाव, दिब्रुगडसह अनेक जिल्हे पाण्याखाली गेले आहेत. त्याचबरोबर भारत-चीन सीमेवरील अनेक भागांचा रस्ता संपर्क तुटला आहे. आसाम राज्यात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानुसार पूरग्रस्त जिल्ह्यांची संख्या १२ वरून १९ झाली आहे. इटानगरमध्ये मुसळधार पावसामुळे ६ जुलैपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आला आहे.