पुणे:
तुकाराम महाराज यांचा पालकी सोहळा अवघ्या दिवसांवर येऊन ठेपला आहे. लाखो भाविक देहूमध्ये दाखल होणार आहेत. इंद्रायणी नदीचे पाणी ते तीर्थ म्हणून घरी नेतात. मात्र ही इंद्रायणी नदी प्रदूषित झाली आहे. या नदीत सांडपाणी मिसळल्याने मोठ्या संख्यने मृत माशांचा खच पडला आहे. मृत माशांमुळे परिसरात दुर्गंधी सुटली आहे. मागील काही दिवसांपासून परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
इंद्रायणीला आधीच जलपर्णीने वेढा घातलेला आहे. जलपर्णीमुळे परिसरात डास, मच्छर आणि आरोग्यास धोकादायक माशा वाढल्या आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तरीही महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. औद्योगिक प्रशासनाला सांडपाणी आणि रसायनयुक्त पाणी सोडण्याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेकदा निवेदनेही दिलेली आहेत. मात्र, त्याचा काहीही परिणाम होताना दिसत नाही.
इंद्रायणी नदीचा उगम हा लोणावळा परिसरातून झाला. ही नदी अनेक गाव, शहरांचा प्रवास करुन आळंदीतून पुढे वाहत जाते. मात्र पिंपरी चिंचवडमधील औद्योगिक वसाहतीचे असणारे मैलायुक्त पाणी हे इंद्रायणी नदीला प्रदूषित करत दिसून येत आहे. वारकऱ्यांनी याबाबत प्रशासनाला अनेकदा निवेदन देऊनही प्रशासनाकडून याबाबत कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही.