सोलापूर – आंतरराष्ट्रीय बाजरी वर्षाच्या निमित्ताने भरड धान्यांचे उत्पादन वाढावे,भारत भरड धान्य उत्पादनात जागतिक केंद्र बनावे म्हणून बाजरीसह,
ज्वारी,राळ,भगर,राजगिरा अशा भरड धान्यांची विक्री रेशन दुकानांमधून करण्यात येणार आहे.
सध्या प्रायोगिक तत्त्वावर आश्रमशाळांना ही बाजरी रेशन दुकानातून उपलब्ध करून दिली जाणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात ९७ तर राज्यात सुमारे ९१५ आश्रमशाळा असून तेथील विद्यार्थ्यांना चपातीपेक्षा बाजरीच्या भाकरी देण्यावर भर दिला जाणार आहे. भारतात भरड धान्यांचे १७० लाख टनापेक्षा जास्त उत्पादन होते. विशेष म्हणजे भरडधान्यांचे आशिया खंडातील ८० टक्के पेक्षा जास्त उत्पादन भारतात घेतले जाते. त्यात पहिल्या दहा राज्यांमध्ये महाराष्ट्र आहे. आशिया व आफ्रिका खंडातील सुमारे आठ कोटी लोकांच्या पारंपारिक आहारात भरड धान्यांचा समावेश आहे. भरड धान्यांमध्ये ज्वारी, बाजरी, भगर (वरई), राळ, राजगिरा, कुटकी, सेंद्री, बर्टी, सावा, कोदो, छाना व कंगनी ही ११ भरड धान्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर निश्चित केली आहेत.