आशिष जयस्वालांचा सस्पेन्स कायम! कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढणार

नागपूर- राटमेक मतदारसंघाचे आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे समर्थक आशिष जयस्वाल हे कोणत्या पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवणार, याचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. ते मुख्यमंत्री शिंदेंसोबत असले तरी त्यांनी अद्याप अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केलेला नाही.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतही त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे आमदार जयस्वाल यांच्याबाबत उत्सुकता अधिक ताणली आहे. आमदार जयस्वाल यांनी मी रामटेकमधून विधानसभा लढणार आहोत. मात्र, कुठल्या पक्षाकडून लढणार, याचे उत्तर लवकरच मिळेल, असे सांगून त्यांनी सस्पेन्स आणखीच वाढवला आहे.
मूळचे शिवसैनिक असलेले आशिष जयस्वाल यांनी रामटेकमधून पाच वेळा धनुष्यबाणावर निवडणूक लढवली आहे. विधानसभेच्या २०१४ मधील निवडणुकीत भाजपच्या मल्लिकार्जुन रेड्डी यांनी त्यांचा पराभव केला होता. पुढील २०१९ च्या निडवणुकीत जयस्वाल अपक्ष लढले आणि विजयी झाले. तेव्हापासून ते महायुतीसोबत आहेत. महाविकास आघाडी सरकार असताना ते उद्धव ठाकरेंच्याही जवळ होते. त्या वेळी ठाकरेंनी त्यांना खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर जयस्वाल हेसुद्धा त्यांच्यासोबत गेले. महायुतीच्या काळातही त्यांच्याकडे खनिकर्म विकास महामंडळ कायम ठेवण्यात आलेले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top