आळंदी शहरात बुधवारपासून पालखीमुळे वाहनांना प्रवेशबंदी

आळंदी – आषाढी वारी काळात आळंदी शहरात औद्योगिक अवजड वाहन आणि चारचाकी वाहनांना बुधवार ७ जून ते १२ जूनपर्यंतच्या कालावधीसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे.केवळ अत्यावश्यक सुविधा पुरविणारी आणि दिंडीची वाहने तसेच शहरातील पासधारक वाहनेच वारी काळात सोडली जाणार असल्याची माहिती आळंदीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी दिली.
संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी पालखी प्रस्थान सोहळा रविवार ११ जून रोजी होणार आहे.या सोहळ्यासाठी वारकऱ्यांचा ओघ चार-पाच दिवस आधी सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियोजन केले आहे. पालखी प्रस्थान ११ जूनला; तर पुण्याकडे पालखी १२ जूनला मार्गस्थ होणार आहे. त्यामुळे ठिकठिकाणी औद्योगीक व चारचाकी वाहने आळंदीला न सोडता ती सहा सात किलोमीटर दूरवरच अडवून वाहतूक अन्य मार्गाने वळवली जाणार आहे. औद्योगिक भागातील अवजड वाहने आणि कामगारांना ने आण करणारी वाहने, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने यांना याबाबत पोलिसांकडून वाहतूक नियोजनाबाबत कळवले आहे.पुण्याहून आळंदीला येणारी वाहने मॅक्झिन चौकातून भोसरीमार्गे वळवली जातील. मोशी-देहू फाटामार्गे आळंदीत येणारी वाहने डुडुळगावपुढील हवालदारवस्तीवर अडवली जातील. चाकणहून आळंदीला येणारी वाहने आळंदी फाट्यावर अडवली जाणार आहेत. वडगाव घेनंद-शेलपिंपळगावमार्गे येणारी वाहतूक कोयाळी फाट्यावर अडवली जातील. मरकळ औद्यागिक भागातून येणारी वाहने धानोरे फाट्यावर चऱ्होली बायपासवर अडवली जाणार आहेत. चिंबळी केळगावमार्गे येणारी वाहने चिंबळी फाट्यावरच अडवली जाणार आहेत.आळंदीत वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडी वाहनांना मात्र प्रवेश दिला जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top