इंदौर –
मध्य प्रदेशातील महू येथील आर्मी परिसरातील वॉर कॉलेजमध्ये रविवारी रात्री वाघ दिसला. लष्कराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या वाघाची हालचाल कैद झाली. याची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी सतर्क झाले. त्यांनी लष्कराच्या अधिकाऱ्यांसह आर्मी वॉर कॉलेज आणि आजूबाजूच्या परिसरात ड्रोन कॅमेराच्या सहाय्याने वाघाचा शोध सुरू केला आहे. सध्या प्राणिप्रेमी आणि वनविभागाच्या सोशल ग्रुपमध्ये या वाघाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
वनविभागाचे अधिकारी कैलाश जोशी यांनी सांगितले की, वन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून या वाघाच्या पंजाच्या खुणा तपासल्या जात आहेत. ड्रोन कॅमेराच्या मदतीने आम्ही या वाघाचा शोध घेत आहोत. वन्यजीव छायाचित्रकार देव वासुदेवन यांनी सांगितले की, महूशी जोडलेला हा भाग महाराष्ट्रापर्यंत जातो. हा संपूर्ण भाग वाघांचा प्रदेश आहे. वाघ कोणत्या मार्गाने रस्ता ओलांडत आहे, हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी आर्मी वॉर कॉलेजमध्ये बिबट्याचीदेखील हालचाल पाहायला मिळाली होती. यानंतर त्याला पकडून जंगलात सोडण्यात आले.