- उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
मुंबई- यंदा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशीलच्या नावाखाली आरे कॉलनीतील तलावांत गणपती विसर्जन करण्यात विघ्न निर्माण झाले होते. मात्र गणपती विसर्जनाला तातडीने बंदी घालता येणार नाही. त्यामुळे यंदा आरे कॉलनीतील तलावांमध्ये गणपती विसर्जनास परवानगी द्यावी, अशी विनंती महापालिकेने आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. तसे प्रतिज्ञापत्र नुकतेच पालिकेने उच्च न्यायालयात सादर केले.
आरे कॉलनीतील छोटा काश्मीर तलाव, गणेश मंदिर तलाव आणि कमल तलाव या तीन तलावांमध्ये गणपती विसर्जनावर बंदी घाला,अशी मागणी याचिका वनशक्ती संस्थेने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेची गंभीर दखल घेत न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने महापालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पालिकेच्यावतीने ज्येष्ठ वकील मिलिंद साठे यांनी शुक्रवारी प्रतिज्ञापत्र सादर केले.पालिकेने आपल्या प्रतिज्ञा पत्रात म्हटले आहे की, आरेतील तलावांमध्ये अनेक वर्षांपासून गणपती विसर्जन केले जाते.त्यामुळे यंदा येथील गणपतींच्या विसर्जनासाठी तत्काळ बंदी घातली तर पर्यायी व्यवस्था करण्यासाठी पालिकेकडे पुरेसा वेळही नाही.त्यामुळे यंदा गणपती विसर्जनाला परवानगी देण्यात यावी, गणपती विसर्जन झाल्यानंतर तलावांचा परिसर स्वच्छ केला जाईल. त्याचप्रमाणे आरे कॉलनी हा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील परिसर आहे.त्यामुळे त्यादृष्टीने पर्यावरणासंबंधी केंद्र सरकारच्या नियम, अटी-शर्तींचे टप्प्याटप्प्याने पालन केले जाईल,हमी प्रतिज्ञापत्राद्वारे दिले आहे.