पाटणा – बिहारमधील बेगुसराय येथे राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) पक्षाचे कार्यकर्ता अनिरुद्ध चौधरी यांची काही गुंडांनी निद्रावस्थेत गोळ्या झाडून हत्या केली. बुधवारी मध्यरात्री ते झोपलेले असताना गुंडांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. ही घटना बलिया दियारा क्षेत्राच्या मधुसुदनपूर गावात घडली. अनिरुद्ध चौधरी आरजेडीचे सक्रीय कार्यकर्ता होते.
अनिरुद्ध चौधरी नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री घरुन जेवून झोपण्यासाठी डेरावर गेले होते. हा डेरा घरापासून जवळच आहे. गुरुवारी सकाळी ते घरी परत न आल्याने कुटुंबिय त्यांना पाहाण्यासाठी डेरावरगेले, तेव्हा ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. त्यानंतर त्यांच्या हत्येचे वृत्त गावभर पसरले. ते शांत स्वभावाचे व मनमिळावू व्यक्ती होते. त्यांचे कोणाशीही वैर नव्हते. मात्र, त्यांचा राजकारणातील वाढता प्रभाव पाहून कुणीतरी हे कृत्य केले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. बेगुसरायचे पोलीस अधीक्षक योगेंद्र कुमार यांनी चौकशी सुरू केली आहे. लवकरच आरोपींना अटक होईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
आरजेडीच्या कार्यकर्त्याची गोळ्या झाडून निघृण हत्या
