मुंबई- आरक्षण हा राज्यघटनेचा आत्मा असून काही लोक या आरक्षणाला विरोध करत आहेत. त्यांच्या विरोधात लढण्याची तयारी ठेवा अशा शब्दात आज उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. ते आज मुंबईतील एलफिन्स्टन महाविद्यालायात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन उपस्थित होते. राज्यातील ४३४ आयआयटी परिसरात उभारण्यात आलेल्या संविधान मंदिराचे त्यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आले.
जगदीप धनखड हे सध्या राज्याच्या दौऱ्यावर असून आजच्या कार्यक्रमात त्यांनी एका प्रकारे विधानसभा निवडणुकींच्या प्रचारालाच सुरुवात केली. गेल्या काही दिवसांपासून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अमेरिकेतील एका विधानावरून भाजपाने आंदोलन सुरु केले आहे. उपराष्ट्रपतींनी आपल्या भाषणातही हा मुद्दा उपस्थित केला. राज्य घटनेचा अनादर करणाऱ्यांविरोधात युवकांनी लढण्याची तयारी ठेवावी असे म्हणत त्यांनी राहुल गांधी हे घटनाविरोधी असल्याचे सूचवले. उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले की, राज्यघटना हा लोकशाहीचा आत्मा आहे. तर संसद ही राज्यघटनेची रक्षणकर्ता आहे. राज्यघटना ही मिरवण्यासाठी नाही तर ती वाचून समजून घेण्यासाठी आहे. याच राज्यघटनेची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयआयटी या तंत्रशिक्षण संस्थांच्या परिसरात ही मंदिरे उभारण्यात आली आहेत. तरुणांनी स्वहितापेक्षा देशहिताचा अधिक विचार करावा. ज्या एलफिन्स्टन महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतले त्या ठिकाणी हा कार्यक्रम होत असल्याबद्दल त्यांनी आनंदही व्यक्त केला.