पनवेल – पनवेल शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासुन दमदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे काही प्रभागांमधील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. प्रामुख्याने नवीन पनवेल, कामोठे, कळंबोली आणि खारघर या चार प्रभागांतील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या चारही प्रभागांतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा प्रत्यक्ष आढावा घेऊन यावर तत्काळ उपाययोजना कराव्यात अशा सूचना पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी संबंधित विभाग अधिकार्यांना दिल्या आहेत. त्यानंतर आता पालिका प्रशासनाने हे खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवातही केली आहे.
यंदा जून महिन्यातच पावसाळा सुरू होण्यापूर्वी या चारही प्रभागांतील रस्त्यांचे पूर्ण डांबरीकरण आणि खड्डे भरण्याचे काम पूर्ण केले होते. पालिकेने २.५१ किमी रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण केले होते. मात्र नवीन पनवेल, कामोठे,खारघर व कळंबोली नोड या प्रभागांत महानगर गॅसमार्फत सुमारे २९.७० कि.मी.लांबीची गॅस वाहिनी टाकण्याकरीता रस्त्यात खोदकाम करण्यात आले.
कामाव्यतिरिक्त इतर अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. तरी हे खड्डे पेव्हर ब्लॉक आणि अन्य पद्धतीचा वापर करून तत्काळ बुजवावेत, अशा सूचना पालिका आयुक्त देशमुख यांनी दिल्या आहेत. त्यानंतर आता चारही प्रभागांतील खड्डे बुजविण्याचे काम पालिका प्रशासनाने हाती घेतले आहे.
आयुक्तांच्या सूचना येताच तातडीने पनवेलचे खड्डे बुजवण्यास सुरुवात
