डब्लिन- डब्लिन येथे झालेला इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील शेवट्याच्या सामन्यात आयर्लंडच्या महिला संघाने इतिहास घडवला. कर्णधार गॅबी लुईसच्या नेतृत्वाखाली आयर्लंडने पाच गडी आणि एक चेंडू राखत प्रथमच टी-२० सामन्यात इंग्लंडला हरवले. प्रेंडरगास्टला तिच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ८ गडी गमावून १६९ धावा केल्या. इंग्लंडकडून सलामीवीर म्हणून ब्रायोनी स्मिथने २६ चेंडूत २८ धावा केल्या, तर टॅमी ब्युमॉन्टने ३४ चेंडूत ४० धावा केल्या. याशिवाय सेरेन स्मॉल १० चेंडूत १० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. तर पेज स्कॉलफिल्डने २१ चेंडूत ३४ धावा केल्या. इंग्लंडला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेण्यात संघातील सर्व खेळाडूंनी योगदान दिले. लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडला चांगली सुरुवात करता आली नाही. सलामीवीर एमी हंटर ३ चेंडूत १ धाव करत तबूंत परतली. मात्र, यानंतर गॅबी लुईस आणि ओरला प्रेंडरगास्टने डावाची धुरा सांभाळली. लुईसने ३५ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने ३८ धावांची खेळी केली, तर प्रेंडरगास्टने ५१ चेंडूंत १३ चौकारांच्या मदतीने ८० धावांची खेळी केली. आयर्लंडने १९.५ षटकांत ५ बाद १७० धावांचे लक्ष्य गाठून ऐतिहासिक विजय मिळवला. प्रेंडरगास्टला तिच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
आयर्लंड महिला संघाने इतिहास घडवला! टी-२० सामन्यात प्रथमच इंग्लंडला हरवले
