आयर्लंडमध्ये वर्णभेदाचा कळस! कृष्णवर्णीय मुलीला पदक नाकारले

डबलिन- आयर्लंडमध्ये जिमस्टार्ट कार्यक्रमामध्ये एका जिम्नॅस्टिक खेळाडूला तिच्या कृष्णवर्णीय रंगामुळे पदक न दिल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. खेळाडूंना पदक देत त्यांचा सन्मान करत असताना कृष्णवर्णीय मुलीला तिच्या रंगामुळे दुर्लक्षित करण्यात आले. हा व्हिडीओ गतवर्षी मार्च महिन्यातील असून सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सर्व मुली पदक स्विकारण्यासाठी रांगेत उभ्या असल्याचे दिसत आहे. पण पदक देताना फक्त एकट्या कृष्णवर्गीय मुलीला वगळता बाकी सर्वांना पदक देत त्यांचा सन्मान करण्यात आला. त्या मुलीलाही नेमके काय झाले आहे याची कल्पना न आल्याने, ती पदक मिळेल यासाठी आर्त नजरेने आयोजकांकडे पाहत होती.

दरम्यान जिम्नॅस्टिक्स आयर्लंडच्या बोर्डने आपण हे प्रकरण गतवर्षीच आपापसात मिटवल्याचा दावा केला होता. पण मुलीच्या आईने यावर असहमती दर्शवली.
क्रिडा संघटनेने अद्यापही योग्य प्रकारे माफी मागितली असे मुलीच्या आईने सांगितले. या व्हिडीओवर अमेरिकन जिम्नॅस्ट सिमोन बायल्सही व्यक्त झाली आहे. ‘व्हिडीओ पाहून मला धक्का बसला. इतर मुलींप्रमाणेच तूदेखील पदकास पात्र आहेस. कोणत्याही खेळात वर्णद्वेषाला जागा नाही.’ असे सिमोनने तिच्या एक्स अकाउंटवर म्हटले आहे.

हा व्हिडीओ व्हायरल होताच ‘जिम्नॅस्टिक्स आयर्लंडच्या बोर्ड आणि कर्मचार्‍यांच्या वतीने आम्ही जिम्नॅस्ट आणि तिच्या कुटुंबियांची मार्च २०२२ मध्ये जिमस्टार्ट कार्यक्रमामध्ये झालेल्या घटनेबद्दल माफी मागू इच्छितो. त्या दिवशी जे घडले ते घडायला नको होते. त्याबद्दल आम्हाला मनापासून खेद आहे. जिम्नॅस्टिक्स आयर्लंड कोणत्याही प्रकारच्या वर्णद्वेषाचा निषेध करते,’ असे निवेदन जिम्नॅस्टिक्स आयर्लंडने जारी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top