मुंबई – देशभरात रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी सर्वाधिक वापरली जाणारी IRCTC.CO.IN ही वेबसाईट आज सकाळी तासभरासाठी ठप्प झाली होती. यावेळी सायबर हल्ल्याची शंका उपस्थित झाली . वेबसाईट डाऊन असल्याने लाखो प्रवाशांना तिकीट बुकिंग व तिकीट रद्द करता येत नव्हते. त्यामुळे प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागला. सुमारे १ तासानंतर ही वेबसाइट पूर्ववत सुरु झाली.
आयआरसीटीसीकडून मिळालेल्या संदेशानुसार ई-तिकटिंग सेवा देखभालीसाठी अनुपलब्ध होती. यूजरनी लॉग इन करताच त्यांना “मेंटेन्सच्या कामासाठी पुढच्या तासाभरासाठी ई-टिकटिंगची सेवा उपलब्ध नाही. कृपया नंतर प्रयत्न करा, असा संदेश येत होता, तर तिकीट रद्दसाठी टीडीआर दाखल करण्यासाठी ग्राहकांनी सेवा नंबर १४६४६,०७५५ -६६१०६६१ आणि ०७५५-४०९०६०० कॉल करावा किंवा etickets@irctc.co.in वर मेल करावे, असे सांगितले जात होते.
डाउनडिटेक्टरने वेबसाइटच्या बिघाडीला पुष्टी दिली.सामान्यत: वेबसाईटच्या देखभालीचे काम रात्री ११ वाजल्यानंतर चालतात. त्यामुळे हा सायबर हल्ला तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली गेली. यावेळी सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस पडला होता. आयआरसीटीसीला टॅग करुन नेटकरी अनेक प्रश्न विचारत होते.