नवी दिल्ली: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना बारावीत ७५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक असते. ही अट हटविण्यात यावी, अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली.
एका विद्यार्थिनीला जेईई मेन्स परीक्षेत ९८ टक्के गुण प्राप्त झालेले आहेत; पण बारावीत तिला ७५ टक्क्यांपेक्षा कमी गुण आहेत. अन्य विद्यार्थ्यांच्या बाबतीतही असेच घडले आहे. त्यांना जेईई परीक्षेत चांगले गुण आहेत. तरीही बारावीतील गुणांच्या निकषामुळे त्यांना ‘आयआयटी’मध्ये प्रवेश मिळू शकत नाही. अशा स्तिथीत ही अट रद्द केली जावी, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती. मात्र हा शैक्षणिक विषय असून त्यावर शिक्षणतज्ज्ञांनी विचार करणे आवश्यक आहे, असे सांगत सुटीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळली. आयआयटीमध्ये प्रवेशासाठी बारावीला ७५ टक्के गुण असणे गरजेचे आहे, ही अट आधीपासून आहे. त्यात आताच हस्तक्षेप करण्याची गरज का, असा सवालही खंडपीठाने विचारला.