कोल्हापूर – काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज कोल्हापूर येथे आश्वासन दिले की, आमची सत्ता आली तर आम्ही निश्चितपणे 50 टक्के आरक्षणाची मर्यादा वाढविणार आहोत. लोकसभा आणि राज्यसभेत आम्ही याचा कायदा मंजूर करू. आम्ही जातगणनाही करणार आहोत. शरद पवार यांनी आरक्षण मर्यादा वाढविण्याची मागणी अलिकडेच केली. त्यापाठोपाठ राहुल गांधी यांनी आरक्षण वाढविणार असल्याचे महत्त्वपूर्ण आश्वासन आज दिले.
आज राहुल गांधी यांनी कोल्हापूर दौर्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण केले आणि संविधान सन्मान संमेलनाला संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी मालवण येथील शिवाजी महाराजांच्या पुतळा पडण्याच्या घटनेवरून भाजपा आणि महायुती सरकारला टोला हाणला. ते म्हणाले की, सरकारची नियत खराब असल्याने राजकोट किल्ल्यावरचा शिवरायांचा पुतळा कोसळला. पुतळा उभाराल, पण मनात शिवरायांचे विचार नाहीत अशी स्थिती आहे.
राहुल गांधी आज सकाळी आठ वाजता कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले. ते विमानतळावर दाखल होताच त्यांच्या मार्गावर भाजपा नेत्यांनी त्यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करून काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर वरिष्ठांच्या सूचनेवरून भाजपाने आंदोलन स्थगित केले. त्यानंतर कसबा बावडा येथे बसवण्यात आलेल्या शिवछत्रपतींच्या बहुशस्त्रधारी पुतळ्याचे अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते झाले. अनावरण केल्यानंतर गांधी यांना छत्रपतींच्या पुतळ्याचा फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमात राहुल गांधी म्हणाले की, आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी इथे जमलो आहोत. हा केवळ एक पुतळा नाही तर एक विचार आहे. पुतळा तेव्हाच बनवला जातो, जेव्हा आपण त्या व्यक्तीच्या विचारांचा आदर करतो. छत्रपती शिवाजी महाराज आयुष्यभर ज्या विचारांसाठी लढले तो विचार आपण पुढे घेऊन जाणार नसू तर आज या पुतळ्याच्या अनावरणाला काहीही अर्थ राहणार नाही. भाजपाने राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. मात्र, काही दिवसांतच तो पुतळा कोसळला. कारण सरकारची नियत खराब होती. शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार असाल, तर त्यांच्या विचारांचे संरक्षण करावे लागेल, असा संदेशच महाराजांच्या पुतळ्याने दिला. भाजपाचे लोक सकाळी उठतात आणि शिवाजी महाराजांच्या विचारांचे संविधान कसे संपवायचे यासाठी
प्रयत्न करतात.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणानंतर राहुल गांधी संविधान सन्मान संमेलनाला उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले की, आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा काँग्रेस आणि इंडिया आघाडी बदलणार आहे. आम्ही केवळ आश्वासन देत नाही. आम्ही जे बोलतो ते करतोच. दुसरा क्रांतिकारी उपाय म्हणजे जातिनिहाय जनगणना.
टेम्पोचालकाच्या घरात भाजी बनवली
खा. राहुल गांधी कोल्हापूर विमानतळावर उतरल्यावर थेट उचगाव येथील टेम्पोचालक अजित तुकाराम संधे यांच्या घरी गेले. जवळपास अर्धा तास राहुल गांधी यांनी संधे कुटुंबाशी संवाद साधला. गांधी यांनी त्यांच्या घरात स्वत: वांग्याची भाजी आणि कांद्याची पात करून त्या कुटुंबाला जेवू घातले. त्यांच्या या कृतीने संधे कुटुंबीय भारावून गेले.