कर्जत- आमदार राम शिंदे यांनी कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये गाव भेट यात्रा काढली आहे . मतदार संघातील सर्व गावांमध्ये आमदार राम शिंदे ही यात्रा घेऊन जात मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत.मात्र या यात्रेमध्ये माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांची समर्थक कार्यकर्ते मात्र सहभागी झालेले नाहीत. ते या यात्रेमधून गायब झाले आहेत यामुळे याची जोरदार चर्चा सध्या मतदारसंघांमध्ये होत आहे.
कर्जत जामखेड मतदार संघामध्ये आमदार राम शिंदे यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांच्याविषयी निकालानंतर विखे समर्थक नाराज होते. विरोधी असणारे उमेदवार निलेश लंके यांना उभे करण्यामध्ये राम शिंदेंचा स मोठा हात आहे, असेही विखे समर्थक उघडपणे बोलत होते. त्यामुळेच कर्जत जामखेड मतदार संघामध्ये या गाव भेट यात्रेमध्ये माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना मानणारे कार्यकर्ते मात्र कुठेच दिसत नाहीत. राम शिंदे यांच्या गाव भेट यात्रेपासून सर्व विखे समर्थकांनी स्वतःला दूर ठेवले आहे. ही नाराजी वाढत गेली तर याचा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार राम शिंदे यांना नक्कीच फटका बसू शकतो, असे बोलले जात आहे.