मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली त्यावेळी त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दिकी कार्यालयातच थांबल्याने बचावले. या प्रकरणानंतर झिशान सिद्दिकी यांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता. परंतु त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत गंभीर चूक झाली आहे. पोलीस उपायुक्तांनी त्यांच्या सुरक्षेची अकस्मात पडताळणी केली. त्यावेळी सुरक्षेसाठी तैनात असलेला सुरक्षा रक्षक कर्तव्याच्या ठिकाणी अनुपस्थित असल्याचे आढळले. त्यामुळे त्याचे निलंबन करण्यात आले आहे.
खेरवाडी परिसरात बाबा सिद्धिकी यांची १२ ऑक्टोबर रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. त्यांच्या सुरक्षेसंदर्भात झिशानने पोलीस उपायुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानंतर पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी
अकस्मात पडताळणी केली असता तिथे पोलीस हवालदार अनुपस्थित असल्याचे आढळून आले.यामुळे त्याचे निलंबन करण्यात आले. याआधी बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर त्यांच्या पोलीस सुरक्षा रक्षकाचे निलंबन करण्यात आले होते. आता झिशानच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या पोलीस सुरक्षा रक्षकाचे निलंबन करण्यात आले.