मुंबई – विधान परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या मतांच्या फोडाफोडीवरून आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीवर कडाडून हल्ला चढवला. महायुतीने फुटीर आमदारांना 20-25 कोटी रुपयांचा भाव दिला. काही आमदारांना दोन दोन एकर जमिनी देण्यात आल्या, असा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला. तर पैसा आणि विकासनिधी हेच मते फुटण्याचे कारण आहे. जनतेच्या पैशावर महायुतीने हा खेळ केला. 5 कोटी रुपये आणि 100 कोटींचा विकासनिधी असे आमिष आमदारांना देण्यात आले होते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला.
महाविकास आघाडीने तिन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनीती आखली होती. पण महायुतीने दाखवलेल्या 20-25 कोटी रुपयांच्या आमिषाला आमच्यातील काही आमदार बळी पडले. त्यामुळे शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला. महायुतीमधील तीनही पक्षांच्या उमेदवारांना त्यांच्याकडे असलेल्या नियोजित मतांपेक्षा अधिक मते मिळाली. यावरून घोडेबाजार झाला हे उघड आहे, असे संजय राऊत म्हणाले. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या संविधान हत्या दिवस पाळण्याच्या निर्णयावरही राऊत यांनी सडकून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागील दहा वर्षांच्या कारकिर्दीतील प्रत्येक दिवस हा संविधान हत्या दिवस आहे, असा घणाघात राऊत यांनी केला.
मतांच्या फाटाफुटीबद्दल बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, जी काही मते फुटली किंवा फोडण्यात आली त्याचे एकमेव कारण म्हणजे पैसा आणि विकासनिधी आहे. पाच कोटी रुपये आणि शंभर कोटी रुपयांची कामे, अशी ऑफर प्रत्येक आमदाराला देण्यात आली होती. दुर्दैवाने काही आमदार या आमिषाला बळी पडले. त्यांची नावे आज-उद्या बाहेर येतीलच. त्यामुळे आपला आमदार पैसे घेऊन फुटला हे मतदारांना समजेल. अशा गद्दारांना जनता कधीच माफ करणार नाही. गद्दारी करणार्यांबद्दल आणि गद्दारी करायला लावणार्यांबद्दल जनतेच्या मनात रोष आहे. तुम्ही पैशाच्या बळावर आमदार विकत घेतले, पण जनतेला विकत घेऊ शकणार नाही.