छत्रपती संभाजीनगर – मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर एकत्र या. आमचा जीव आरक्षणात, मात्र सरकारचा जीव खुर्चीत आहे. आरक्षण मिळून दिले नाही तर आम्ही सत्ता येऊ देणार नाही. तुम्ही आरक्षण देणार नसाल तर आम्हाला पाडापाडी करावी लागेल, असा थेट इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी मनोज जरांगे पाटील बोलत होते. यावेळी बोलताना, आरक्षण द्यायला काहीच लागत नाही. मनात असेल तर काही करता येते मनात असेल तर देता येते. सत्तर वर्षापासून सगळे वेड्यात काढत आहेत. लोकांच्या मनात खदखद आहे. लोकांना समजते की आपल्याला कोण उल्लू बनवते. विरोधक आणि सत्ताधारी हे उल्लू बनवतात, अशी टीका जरांगे यांनी केली.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर लाईव्ह चर्चा करावी असे आवाहन केले. यावर बोलताना राजकीय नेत्यांना आणि समाजाला आमच्यात आणि सरकारमधील चर्चेची माहिती हवी असेल, तर सर्व लाईव्ह आहे. सत्ताधारी आणि विरोधक गैरसमज पसरवणार आहेत. माझ्या समाजाने राजकीय नेत्यांची हमाली का करायची, असा प्रश्न उपस्थित करत विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांचे मराठा समाजासाठी नाटक सुरू आहे, असे जरांगे म्हणाले.