चेन्नई – तामिळनाडूच्या पलाकोडू येथील एका सरकारी शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांकडून स्वच्छतागृहांची सफाई त्याचप्रमाणे इतर कामे करुन घेणाऱ्या मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे. शाळेच्या गणवेशात शौचालय साफ करणाऱ्या एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
पलाकोडू गावातील शाळेत जाणार्या मुलांच्या पालकांनी या संदर्भात म्हटले आहे की, मुले जेव्हा शाळेतून घरी यायची तेव्हा ती थकलेली दिसायची. त्यांना त्यांच्या अभ्यासाकडेही लक्ष देता येत नव्हते. त्यांच्याकडून मुख्याध्यापक विविध कामे करुन घेत होते. त्यांना शाळेची सफाई व इतर कामे करायला सांगितले जात होते. आम्ही मुलांना शाळेत शिक्षण घ्यायला पाठवतो. साफसफाई करायला नाही. विद्यार्थ्यांना शाळेत व्यवस्थित शिकवलेही जात नाही.
या व्हिडीओनंतर जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आश्वासन दिले असून मुख्याध्यापकाला निलंबित केले आहे. त्याच्यावर अधिक कठोर कारवाई करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.