मुंबई – आदिपुरुष चित्रपट ज्या ज्या थिएटरमध्ये प्रदर्शित होईल, त्या थिएटरमध्ये हनुमानासाठी एक जागा रिकामी ठेवण्याचा निर्णय चित्रपट निर्मात्यांनी घेतला. चित्रपटसृष्टीच्या इतिहासात असा अनोखा निर्णय प्रथमच घेण्यात आला आहे.
आदिपुरुष चित्रपटाच्या निर्मात्यांनी म्हटले की, जिथे रामायणाचे पठण केले जाते, तेथे हनुमानाचे दर्शन होते. यावर आमचा ठाम विश्वास आहे. या श्रद्धेला मान देत आदिपुरुष प्रदर्शित होईल त्या प्रत्येक थिएटरमध्ये पहिली एक सीट हनुमानासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट 16 जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेमध्येही चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाच्या गीताचा ट्रेलर प्रकाशित करण्यात आला. अजय अतुल या जोडीने संगीत दिले आहे. ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट भव्यदिव्य साकारला असला तरी सुरुवातीपासून हा चित्रपट वादात सापडला आहे. हनुमानाला दाढी दाखविली असून, ती इतर धर्मिय व्यक्तीप्रमाणे राखली आहे हा वादाचा पहिला मुद्दा होता.
राम आणि सीता यांचे चित्रपटातील रूपही प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेले नाही. चित्रपट स्वातंत्र्याच्या नावाखाली काही उलटसुलट तर दाखविले नाही ना अशी शंका व्यक्त होत आहे. अनेक वाद सुरू असले तरी चित्रपटाबाबत उत्सुकता असून, ती कायम राहावी यासाठी नवनवीन शकले लढवित निर्मात्यांनी आता एक सीट राखीव ठेवण्याची घोषणा केली आहे.
‘आदिपुरूष’ निर्मात्यांचा निर्णय हनुमानासाठी एक सीट रिकामी
